मतदारांनी योग्य उमेदवाराची निवड करावी यासाठीही आता निवडणूक आयोगाने पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून उमेदवाराने सादर केलेले प्रतिज्ञापत्र तपासण्याचे आणि उमेदवाराची गुन्हेगारी स्वरूपाची पाश्र्वभूमी आहे का, तेही तपासण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम आयोगाने हाती घेतली आहे. ‘पहले करेंगे पता, फिर चुनेंगे नेता’ अशा आशयाची पोस्टर्स दिल्लीतील विविध भागांमध्ये निवडणूक आयोगाने लावली आहेत. मतदान करण्यापूर्वी उमेदवाराची माहिती करून घ्यावी यासाठी आम्ही जनतेला प्रोत्साहन देत आहोत. सर्व उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी चंद्रभूषणकुमार यांनी सांगितले.
इतकेच नव्हे तर उमेदवाराची योग्य माहिती मिळावी यासाठी अग्रगण्य वृत्तपत्रांमधून जाहिराती देऊनही मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्यामुळे मतदार योग्य उमेदवारालाच मतदान करतील, असेही मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले. निवडणूक जनजागृती कार्यक्रमासाठी कुस्तीपटू सुशीलकुमार याची मदत घेतली जात आहे. गेल्या वेळी क्रिकेटपटू विराट कोहली याची मदत घेण्यात आली होती.