सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला दिला देणारा निकाल दिला आहे. आठ आठवड्यांसाठी या व्यक्तीला अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. तसेच हा निकाल देताना न्यायालयाने वैवाहिक बलात्कार (मॅरिटल रेप) म्हणजेच विवाह झाल्यानंतर बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्याच्या तक्रारींसंदर्भात प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. एकमेकांसोबत पती-पत्नी म्हणून राहणाऱ्या जोडप्यामधील शरीरसंबंधांना बलात्कार म्हणता येईल का असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केलाय. सरन्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे, न्या. ए. एस. बोपन्ना आणि न्या. वी. राजसुब्रमण्यम यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने, “जर एखादं जोडपं पती पत्नी म्हणून एकमेकांसोबत पाहत असेल तर पती कितीही क्रूर असला तरी त्या दोघांमधील शरीरसंबंधांना बलात्कार म्हणता येईल का?,” असा प्रश्न उपस्थित केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेगवेगळ्या प्रकरणांसर्भात निकाल देताना खंडपीठाने हे निरिक्षण नोंदवलं आहे. या याचिकांपैकी एका याचिका आरोपीचीही आहे. या आरोपीने एप्रिल २०१९ मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने दिलेल्या निकालाला आव्हान दिलं आहे. उच्च न्यायालयाने आरोपीच्या विरोधात उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्धनगर जिल्ह्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची नोंद रद्द करण्याची मागणी फेटाळू लावली होती.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या सुनावणीदरम्यान तक्रारदार महिलेची बाजू मांडणाऱ्या वकीलाने आरोपीने महिलेची फसवणूक करुन तिची सहमती मिळवल्याचा दावा केला. आरोपी २०१४ साली महिलेला हिमाचल प्रदेशमधील मनाली येथील एका मंदिरामध्ये घेऊन गेला आणि त्यांनी तिथे लग्नाच्या विधी केल्याची माहिती वकीलाने दिली.

“लग्नाचं खोटं आश्वासन देणं चुकीचं आहे. कोणत्याही महिलेनेही अशाप्रकारचं आश्वासन देऊन नंतर शब्द फिरवता कामा नये,” असं मत खंडपीठाने नोंदवलं. याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील विभा दत्त मखीजा यांनी आरोपी आणि महिला दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यानंतर या महिलेने लग्नाचं खोटं आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा आरोप करत पोलिसांमध्ये या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये याचिकाकर्त्याविरोधात भारतीय दंडसंहिता (आयपीसी) कलम ३७६ (बलात्कार) च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीला त्रास देण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा, याचिकार्त्याचे वकील मखीजा यांनी केलाय. तर ही तक्रार दाखल करणाऱ्या महिलेची बाजू मांडणाऱ्या वकीलांनी आरोप ठेवण्यात आलेल्या व्यक्तीने केवळ या महिलेचा पती असल्याचं नाटक केलं. मात्र नंतर त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा आरोप केला. आरोपीने महिलेला मारहाण केल्याचेही यामध्ये नमूद करण्यात आलं असून दोघांमधील शरीरसंबंधांसंदर्भातील वैद्यकीय पुरावेही न्यायालयासमोर दाखल करण्यात आले. मात्र पती-पत्नी म्हणून राहणाऱ्या या दोघांमधील संबंधांना बलात्कार म्हणता येईल का असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. या व्यक्तीला अटकेपासून आठ आठवड्यांची सुरक्षा देण्यात आलीय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can sexual intercourse between man and wife be called rape supreme court stays arrest of rape accused for 8 weeks scsg
First published on: 02-03-2021 at 08:18 IST