परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी चांगलं वृत्त आहे, कारण कॅनडाने विद्यार्थी व्हिसाच्या (स्टुडंट व्हिसा) नियमांमध्ये बदल केला आहे. याद्वारे भारत आणि अन्य तीन देशांच्या विद्यार्थ्यांना सहज आणि जलदगतीने व्हिसा मिळणार आहे. एकीकडे कॅनडामध्ये जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय आणि आता व्हिसा नियमांमध्ये बदल करण्यात आल्यामुळे व्हिसा काढण्यासाठी लागणारा वेळ बराच कमी होणार आहे, त्यामुळे कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांसाठी जणू रेड कार्पेटचीच सोय केली आहे.

यापूर्वी व्हिसाच्या प्रक्रियेसाठी 60 दिवसांचा वेळ लागायचा, पण आता नियमांमध्ये बदल केल्यामुळे केवळ 45 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना व्हिसा मिळेल. भारताव्यतिरिक्त चीन, व्हिएतनाम आणि फिलिपाइन्स या देशांसाठी कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये बदल केला आहे. या देशांमधील ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि भाषेवर प्रभुत्व आहे असे विद्यार्थी कॅनडाच्या एसडीएस म्हणजे स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम या अभ्याक्रमासाठी पात्र ठरतील. यापूर्वी स्टुडंट पार्टनर्स प्रोग्राम लागू होता,यामध्ये विद्यार्थ्यांना कमी संधी मिळत होती आणि याद्वारे कॅनडाच्या ठरावीक 40 महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागत होता. पण आता एसडीएसद्वारे विद्यार्थी महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी सर्व अग्रगण्य संस्थांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करु शकतात. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार वर्ष 2017 मध्ये भारताच्या 83 हजार 410 विद्यार्थ्यांना व्हिसा बहाल करण्यात आला होता तर चिनच्या 83 हजार 195 विद्यार्थ्यांना व्हिसा मिळाला होता.