यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकासानीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या बैठकीवरुन पश्चिम बंगाल विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष दिसून येत आहे. पंतप्रधांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उशिरा हजेरी लावली होती. त्या नुकसान झालेल्या भागाचा अहवाल देत तेथून निघून गेल्या होत्या. आता राज्याचे मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांनी दिल्ली येथे उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे. यानंतर गृहमंत्रालयाने सोमवरी सकाळी दहा वाजेपर्यंत कार्मिक व प्रशिक्षण विभागात (DoPT- Department of Personnel and Training) उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. परंतु पश्चिम बंगालच्या राज्य सरकारने त्यांना अद्याप जबाबदारीतून मुक्त केलेले नाही. यावर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहीत सध्याच्या परिस्थितीत त्यांना परत पाठवणे शक्य नसल्याचे सांगितले आहे.

मुख्य सचिवांना परत बोलवण्याचा निर्णय माघे घ्या अशी विनंती ममता यांनी नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात केली आहे. मुख्य सचिवांना परत बोलवण्याच्या एकतर्फी आदेशाने आश्चर्यचकित झाल्याचे ममता यांनी सांगितले आहे. सोमवारी यास चक्रीवादळामुळे झालेले नुकसान करोना संदर्भात मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. अल्पन बंड्योपाध्याय हे टास्क फोर्सचे प्रमुख देखील आहेत.

आणखी वाचा- “जनतेच्या हितासाठी पंतप्रधानांचे पाय धरायलाही तयार; सूडाचे राजकारण बंद करा!”

२८ मे रोजी केंद्राने अल्पन बंड्योपाध्याय यांना परत बोलावले होते आणि ममता बॅनर्जी सरकारला अधिकाऱ्याला तातडीने सोडण्यास सांगितले होते. या आदेशाला सत्ताधारी टीएमसीने विरोध दर्शवला होता. १९८७ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असणारे बंड्योपाध्याय हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते. मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या विनंती नंतर केंद्राकडून त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली.

आणखी वाचा- “भारतीय १५ लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; तुम्हीही थोडी वाट बघा”

यास चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथे झालेल्या झालेल्या नुकसानीचा पंतप्रधान मोदींनी आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी बंगालच्या मेदिनापूर येथे एक आढावा बैठक घेतली होती. पंतप्रधानांच्या या बैठकीत ममता बॅनर्जी या ३० मिनिटे उशिरा पोहोचल्या होत्या. यावेळी ममता यांच्यासोबत मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय होते. त्यानंतर बंडोपाध्याय यांची तात्काळ मुख्य सचिव पदावरुन बाजूला करत दिल्ली येथे बदली केली.