करोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं, उद्योगधंदे बंद होते. अर्थव्यवस्थेला होणारं नुकसान लक्षात घेता सरकारने टप्प्या-टप्प्याने एक-एक गोष्टी सुरु करण्यास सुरुवात केली आहे. ८ जून पासून देशभरात धार्मिक स्थळं सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी देव संस्थांनांना स्वच्छता व गर्दी होणार नाही या गोष्टींची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी सॅनिटायजरचा वापर करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. मात्र सॅनिटायजरमध्ये दारुचा समावेश असल्यामुळे भोपाळमधील पुजाऱ्यांनी याला विरोध केला आहे.

“सरकारच्या नवीन नियमांप्रमाणे देवळात सॅनिटायजर मशिन लावण्याचं अनिवार्य करण्यात आलेलं आहे, माझा याला विरोध आहे कारण सॅनिटायजरमध्ये दारु असते. ज्या प्रमाणे दारु पिऊन मंदिरात प्रवेश करणं योग्य मानलं जात नाही, त्याचप्रमाणे हातावर दारु घेऊन आत प्रवेश करणं योग्य ठरणार नाही.” माँ वैष्णवधाम नवदुर्गा मंदिराचे पुजारी चंद्रशेखर तिवारी यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली. मात्र लोकांना हात धुण्यासाठी व्यवस्था व साबण ठेवण्याची तयारी असल्याचंही तिवारींनी यावेळी सांगितलं.

केंद्र सरकारच्या नवीन नियमांप्रमाणे स्वच्छतेसोबत मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं करण्यात आलं आहे. यासोबत गाभाऱ्याती मुर्तीला स्पर्श न करणं, प्रसाद, नारळ-हार इ. गोष्टी अर्पण करण्यास सध्या मनाई करण्यात आली आहे.