जीएसटी परिषदेकडून नुकतीच काही वस्तूंच्या करामध्ये कपात करण्यात आली होती. त्यामुळे टीव्ही आणि कारच्या किंमती घटतील अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, रुपयाची किंमत सातत्याने घसरत चालल्याने याचा उलटा परिणाम झाला असून या वस्तूंच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी लागणारे सुट्या भागांची आयात महागणार असल्याने हा परिणाम होणार आहे. याला जागतिक व्यापारातील युद्धजन्य परिस्थिती देखील कारणीभूत आहे.

या ट्रेड वॉरमुळे अमेरिकेत व्याजाचे दर वाढल्याने डॉलर मजबूत झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम भारतीय रुपयावर पडला असून गेल्या काही महिन्यांपासून त्याचे मुल्य सातत्याने घसरत आहे. सध्या एका डॉलरची किंमत ६९.१ रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे रुपयाची सद्यस्थिती आशियातील सर्वात वाईट असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील काही काळ रुपयाची घसरण अशीच सुरु राण्याची शक्यता आहे.

रुपयाची सध्याची कमजोर स्थिती पाहता आयात महाग होणार आहे त्यामुळे घरगुती उपकरणांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. याबाबत बोलताना मारुती सुझूकीचे वरिष्ठ अधिकारी कालसी यांनी सांगितले की, आम्ही रुपयामध्ये घसरणीचा परिणाम पाहत आहोत. त्यामुळे कार क्षेत्रातील किंमतींचे आकलन आम्ही करु शकतो. या देशातील सर्वात मोठी कार कंपनी मोठ्या प्रमाणावर देशांतर्गतच उत्पादन करते. मात्र, आपल्या खेरदी आणि व्हेंडर्सच्या खरेदीसाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर डॉलरवर अवलंबून रहावे लागते.

मारुती सुझूकीला परदेशातून इलेक्ट्रिकल, अंतर्गत पार्ट, ईसीयू, इंजिन आणि ट्रान्समिशन पार्ट यांसारखे सुटे भाग आयात करावे लागतात. त्याचबरोबर त्यांची सहयोगी कंपनी सुझूकीला त्यांना रॉयल्टीही द्यावी लागते. त्याशिवाय अन्य गोष्टीही कंपनीच्या वित्तपुरवठ्यावर परिणाम करतात. त्यामुळे सहाजिकच कारच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. तसेच प्रसिद्ध जपानी कंपनी टोयोटाचे देखील म्हणणे आहे की, रुपयांमध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीवर आमचे लक्ष असून त्यानुसार कारच्या किंमतींबाबत निर्णय घेतले जाऊ शकतात.