हैदराबाद (एक्स्प्रेस वृत्तसेवा) :  निवृत्त न्यायाधीश एन. आर. मोहन राव, त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्याविरुद्ध हैदराबाद पोलिसांनी सुनेचा छळ करून मारहाण केल्याप्रकरणी पाच महिन्यांनंतर गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीचे सीसीटीव्ही व्हिडीओ फुटेज शुक्रवारी व्हायरल झाले.

राव यांच्या सुनेच्या कुटुंबीयांनी हे व्हिडीओ फुटेज जारी केले असून त्यामध्ये २० एप्रिल २०१९ ही तारीख स्पष्टपणे दिसत आहे. आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू उच्च न्यायालयात राव यांनी काम केले असून ते एप्रिल २०१७ मध्ये निवृत्त झाले.

राव यांचा मुलगा एन. वशिष्ठ पत्नी सिंधू यांना भांडण करताना मारहाण करीत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. राव आणि त्यांची पत्नी दुर्गालक्ष्मी तेथे येऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही दिसत आहे. वशिष्ठ हा सिंधू यांना ठोसे आणि श्रीमुखात भडकावताना दिसत आहे तर राव हे सिंधू हिचे हात ओढून तिला सोफ्यावर ढकलत असताना दिसत आहे.

व्हिडीओच्या अखेरीला सिंधू यांची कन्या त्या खोलीत येऊन आपल्या आईकडे धावत जाताना दिसत आहे. त्यानंतर या मुलीला बाहेर त्या खोलीतून बाहेर काढण्यात आल्याचेही दिसत आहे. सिंधू यांनी २७ एप्रिल रोजी हैदराबाद पोलिसांकडे तक्रार नोंदविली आणि पती आणि सासूने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे म्हटले आहे.