दिल्लीतील सदर बाजार येथे एक अजब प्रकरण समोर आलं आहे, जिथे एका गायीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायीने दिलेल्या धडकेत पाय फ्रॅक्चर झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा दाखल झाल्याने नेमकी काय कारवाई करायची या विचारानेच पोलीस हैराण झाले आहेत. झालं असं की, गायीने टक्कर दिल्याने दुचाकीवारुन प्रवास करत असलेल्या व्यवसायिकाचा पाय फ्रॅक्चर झाला. पाय फ्रॅक्चर झाल्याच्या रागात व्यवसायिकाने सदर बाजार पोलीस ठाण्यात गायीविरोधात तक्रार दाखल केली. पण आता या गायीची ओळख नेमकी कशी करायची ? गाय कोणाची आहे याचीही माहिती नसल्याने पोलीस हैराण झाले आहेत. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेले ४५ वर्षीय व्यवसायिक मोहम्मद शकील आपल्या कुटुंबासोत दरियागंज परिसरात राहतात. दिल्ली गेट येथे त्यांचं हेअर मशीन मसाजर बनवण्याचा कारखाना आहे. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचं नेहमी सदर बाजार येथे येणंजाणं असतं.

२७ एप्रिलला संध्याकाळी ७.१५ वाजता दुचाकीवरुन ते सदर बाजारात चालले होते. यावेळी एका गायीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली ज्यामुळे ते खाली पडले आणि पाय जखमी झाला. जखमी अवस्थेत त्यांना एलएनजेपी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांच्या पायाला फ्रॅक्चर असल्याचं निष्पन्न झालं. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायीचा रंग आणि आकाराच्या सहाय्याने तपास घेण्यात आला, मात्र अद्याप शोध लागलेला नाही.