व्यवस्थापन क्षेत्रामध्ये पदव्युत्तर पदवीसाठी घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट (कॅट) चे निकाल लागले आहेत. या परिक्षेमध्ये किमान २० जणांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. त्यापैकी पॅट्रिक डिसुझा आणि यश चौधरी या दोघांनी महाराष्ट्रातून परीक्षा दिली आहे. भारतामधून दरवर्षी हजारो विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यांच्यापैकी काही विद्यार्थ्यांनाच या परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीनुसार इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेश मिळतो.

आयआयएम बंगळुरुने या परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालाची यादी ( http://www.iimcat.ac.in) या वेबसाइटवर उपलब्ध आहे. देशातील १३८ केंद्रावर सुमारे २ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. पॅट्रिक डिसुझा यांचे कोचिंग क्लासेस आहेत. मागील वर्षी देखील त्यांनी १०० पर्सेंटाइल स्कोअर केले होते तर यश चौधरी पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला आहे.

‘कॅट’ परीक्षेचे स्वरुप

* ‘कॅट’ ही संपूर्णपणे ऑनलाइन परीक्षा असून परीक्षेचा कालावधी या वर्षांपासून १७० मिनिटांवरून १८० मिनिटे म्हणजेच तीन तास इतका आहे.
* ‘कॅट’च्या नव्या स्वरूपानुसार, या परीक्षेत एकूण १०० प्रश्न असतात. सांख्यिकी विभाग आणि शाब्दिक क्षमता विभागावर प्रत्येकी ३४ प्रश्न विचारले जातात.
* माहितीचा अर्थ लावणे तसेच तार्किक क्षमतेवर आधारित असे ३२ प्रश्न असतात.
* प्रत्येक विभागातील प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी प्रत्येकी ६० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. परीक्षार्थीना एकावेळी एकाच विभागातील प्रश्न सोडवता येतील.
* संगणकाच्या पडद्यावर असलेला कॅलक्युलेटर वापरता येतो.
* सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. परंतु काही प्रश्नांना उत्तरांसाठी बहुपर्याय उपलब्ध नसतात. या प्रकारच्या प्रश्नांच्या अचूक उत्तरासाठी प्रत्येकी ३ गुण मिळतात. मात्र, चुकीच्या उत्तरांना किंवा प्रश्नच सोडवला नसेल तर गुण वजा होणार नाहीत (निगेटिव्ह मार्किंग नाही).
* जे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे आहेत, त्या प्रश्नांचे उत्तर अचूक आल्यास प्रत्येकी ३ गुण मिळतील आणि चुकीच्या उत्तरासाठी प्रत्येकी १ गुण वजा होईल.
* या परीक्षेचा अभ्यास करताना सांख्यिकीविषयक प्रश्नांचा नियमित सराव करणे अत्यंत आवश्यक आहे.
* शाब्दिक क्षमतेवरील आधारित प्रश्नांसाठीही नियमित वाचन करणे गरजेचे आहे. शाब्दिक क्षमता ही एका दिवसात वाढवता येत नाही. त्यासाठी वृत्तपत्रे, पुस्तके, जर्नल्स अशा अनेक मार्गानी प्रयत्न करावा लागतो.
* जो विभाग डेटा इंटरप्रिटेशन व तार्किक सुसंगतीवर (लॉजिकल रिझनिंग) आधारित आहे अशा विभागातील प्रश्नांसाठीसुद्धा नियमित सराव आवश्यक असतो. या परीक्षेत ऑन स्क्रीन कॅलक्युलेटर वापरण्याची परवानगी जरी दिली असली तरी त्यासाठीसुद्धा सराव लागतो. कॅलक्युलेटरचा वापर करण्यातही बराच वेळ दवडू शकतो, म्हणून सराव करायला हवा. मात्र, त्याचबरोबर कॅलक्युलेटर कमीत कमी वापरावा लागेल अशी तयारी करायला हवी.