आयपीएलमधील सट्टेबाजीप्रकरणातील आरोपींकडून लाच घेतल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे माजी सहसंचालक जे पी सिंह यांना सीबीआयने मंगळवारी अटक केली. सिंह यांच्यासह त्यांच्या तीन सहका-यांनाही अटक करण्यात आली असून सीबीआयनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सुरतमध्ये २०१५ – १६ या कालावधीत हवाला आणि आयपीएलमधील सट्टेबाजीचे रॅकेट उघडकीस आले होते. या प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी सुरु होती. याप्रकरणातील आरोपींकडून ईडीचे माजी सहसंचालक जे पी सिंह यांनी लाच घेतल्याचा आरोप होता. याप्रकरणात सीबीआयने जे पी सिंह, त्याचे सहकारी संजयकुमार, विमल अग्रवाल आणि चंद्रेश पटेल या तिघांना अटक केली आहे. याप्रकरणातील तीन बुकींना सीबीआयने सर्वात आधी अटक केली होती. हे तिघेही सिंह यांचे एजंट असल्याचे समोर आले होते.
सिंह यांच्या लाचखोरीप्रकरणी ईडीनेच तक्रार दाखल केली होती. यापूर्वीही सिंह यांच्यावर लाच मागितल्याचा तसेच छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. जे. पी. सिंह हे भारतीय महसूल सेवेच्या २००० च्या बॅचचे अधिकारी असून सध्या ते सीमा व उत्पादन शुल्क विभागात आयुक्त म्हणून कार्यरत होते. मोठ्या अधिका-यावर झालेल्या या कारवाईने उत्पादन शुल्क विभागात खळबळ माजली आहे.

सीबीआयने याप्रकरणात तक्रार दाखल करण्यापूर्वी गुप्तचर यंत्रणेनेही सिंहविरोधात अहवाल दिला होता. सीबीआयने अहमदाबाद कोर्टात दिलेल्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणेच्या अहवालाताही सिंह यांनी आरोपींकडून पैसे उकळल्याचा उल्लेख करण्यात आला होता. सीबीआयने मुंबईतील बुकी विमल अग्रवाल आणि सोनू जालनविरोधात गुप्तचर यंत्रणेच्या अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. जालन आणि अग्रवालने २०१५ मध्ये दिल्लीमध्ये वारंवार भेट दिली. यात त्यांनी जे के अरोरा या बुकीच्या मदतीने ईडीच्या रडारवर असलेल्या विविध बुकींकडून पैसे घेतले होते. कारवाई टाळण्यासाठी हे पैसे घेण्यात आले होते.