ईशान्य भारतीय विद्यार्थी आणि अरुणाचल प्रदेशचे आमदार यांचा १९ वर्षीय मुलगा निदो तानिया याच्या हत्येप्रकरणातील आरोपींविरोधातील खूनाचा आरोप केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने मागे घेतला आहे. निदोची हत्या ही पूर्वनियोजित नसून किरकोळ वादातून झाल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
निदोचा मृत्यू मारहाणीतून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी फरमन, सुंदर पवन आणि सन्नी उप्पल यांच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने शुक्रवारी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादर केलेल्या आरोपपत्रात सात आरोपींची नावे नमूद केली आहेत. यामध्ये तीन अल्पवयीन आरोपी आहेत. यापैकी चारजणांवर सदोष मनुष्यवध, बेकायदेशीर बंधक बनवणे आणि अ‍ॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अल्पवयीन आरोपींविरोधात बालन्यायालयामार्फत कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.
२९ जानेवारी रोजी लजपत नगर येथे निदोच्या केशरचनेवरून एका टोळक्याशी झालेल्या बाचाबाचीनंतर त्याचा मृत्यू झाला होता.