स्मृती इराणी यांची माहिती
सीबीएसईची पुस्तके आता ऑनलाइनवर मोफत उपलब्ध करून दिली जात आहेत व तो सरकारच्या सुप्रशासन प्रयत्नांचा एक भाग आहे, असे मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज सांगितले.
पूर्व दिल्लीतील एका केंद्रीय विद्यालयातील कार्यक्रमप्रसंगी त्यांनी सांगितले की, शाळांच्या अध्यापन प्रक्रियेत सुधारणा व्हावी व मुलांना शिक्षणाची चांगली साधने उपलब्ध व्हावीत हा त्यामागचा हेतू आहे. सध्या एनसीईआरटीची पुस्तके ऑनलाईनवर इ बुक स्वरूपात उपलब्ध आहेत, मोबाइलवरही ही पुस्तके अ‍ॅपवर पाहता येतात. सीबीएसईची पुस्तकेही आता ऑनलाइन उपलब्ध होत आहेत. त्यात चित्रफितीही असतील व त्यातून शिक्षणासाठी आणखी सुलभता निर्माण होणार आहे, सुप्रशासनाचाच हा एक भाग आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की, मुले नुसती अभ्यासात हुशार होणे अपेक्षित नाही तर ती चांगली माणसे म्हणून घडली पाहिजेत. त्यावर इराणी यांनी सांगितले की, आम्ही त्यावर उपाय म्हणून बालसभा हा उपक्रम हाती घेत आहोत. मुले व विविध क्षेत्रातील व्यावसायिक यांच्यात संवाद घडवून आणला जाईल व त्यांनी चांगले माणूस बनण्यासाठीही प्रयत्न केले जातील. शाला दर्पण व सारांश नावाच्या सेवा आम्ही पहिली ते बारावी या वर्गासाठी पुढील शैक्षणिक वर्षांत केंद्रीय विद्यालयातून राबवणार आहोत. त्यात शाला दर्पण या सेवेत पालकांना त्यांच्या मुलांची उपस्थिती व वेळापत्रक व गुण कळवले जातील. संघर्ष या उपक्रमात पालकांना विषयानुसार मुलांची प्रगती कळवली जाईल. जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर हा उपक्रम घेतला जाईल.
शिसोदिया यांनी सांगितले की, जर एखादा मुलगा २० वर्षे अनेक संस्थात शिक्षण घेऊन बाहेर पडणार असेल तर तो संवेदनशील होऊन बाहेर पडला पाहिजे त्यासाठी त्या मुलाला आपण काल कसे होतो व आज कसे आहोत हे कळले पाहिजे, त्यांच्या वर्तनात सुधारणा दिसली पाहिजे.