नवी दिल्ली :  पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या उद्रेकाच्या १५ हजार घटना घडल्या आणि त्यामध्ये २५ जण ठार झाले आणि सात हजार महिलांचा विनयभंग करण्यात आला असा अहवाल सत्यशोधन समितीने सादर केला असून त्यासंदर्भात कारवाई करण्याचे आश्वाासन मंगळवारी केंद्र सरकारने दिले.

सिक्कीम उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश (निवृत्त) प्रमोद कोहली यांच्या अध्यक्षतेखालील ‘कॉल फॉर जस्टीस’ या नागरी गटाने सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, २ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर हिंसाचाराचा राज्यभर उद्रेक झाला आणि तो अनेक गावांमध्ये पोहोचला. त्यावरून हिंसाचाराच्या घटना तुरळक नव्हत्या तर संघटित होत्या हे सुस्पष्ट आहे, असेही अहवालामध्ये म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालय या अहवालाचा अभ्यास करील आणि त्यामध्ये करण्यात आलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करील, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी  सांगितले. या पाच सदस्यीय समितीमध्ये दोन निवृत्त सनदी अधिकारी होते.  आणि भारतीय पोलीस सेवेतील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.