महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्ह्जवरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना देशभावनेसाठी निगडीत घटना असताना देशहिताचा विचार केला पाहिजे असं मत केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी नोंदवलं आहे. यावेळी त्यांनी सरकार क्रीडा संघटनांमध्ये हस्तक्षेप करु शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच बीसीसीआयने हे प्रकरण आयसीसीकडे नेलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं आहे.

वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटकडे असलेले विशेष ‘बलिदान’ चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज वापरले असून त्यावरुन वाद सुरु झाला आहे. आयसीसीने बीसीसीआयकडे धोनीला हे ग्लोव्ह्ज वापरु नये अशी सूचना कऱण्याची विनंती केली आहे. तर बीसीसीआयने आम्ही यासंदर्भात आयसीसीकडे परवानगी मागितली असून प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर याबाबत सविस्तर माहिती देऊ असं सांगितलं आहे.

‘सरकार क्रीडा संघटनांच्या कामकाजात हस्तक्षेप करु शकत नाही. त्या स्वायत्त आहेत. पण जेव्हा मुद्दा देशभावनेशी निगडीत असतो, तेव्हा देशहिताचाही विचार झाला पाहिजे. हे प्रकरण आयसीसीआकडे नेलं जाव अशी विनंती मी बीसीसीआयकडे करतो’, असं किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे.

#DhoniKeepTheGlove : आयसीसीचे नियम काय सांगतात

धोनीच्या ग्लोव्ह्जचा वाद; BCCI चे प्रशासक म्हणतात…

दुसरीकडे भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया याने धोनीचं कौतुक केलं असून चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्यांचंही विशेष कौतुक केलं आहे. पण खेळात नियमापेक्षा खेळाडू मोठा नसतो असंही त्याने सांगितलं आहे. बायचुंग भुतियाने सांगितलं आहे की, ‘मला वाटतं धोनीचा निर्णय़ कौतुकास्पद आहे, पण खेळात नियमांचं पालन करणंही तितकंच महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. जर नियम परवानगी देत नसतील तर मला वाटतं धोनीने विशेष ‘बलिदान’ चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज वापरु नयेत’.