News Flash

६ मे २०२० पासून प्रति लिटर पेट्रोलमागे ३३ रुपये तर डिझेल मागे ३२ रुपयांचा महसूल कमावला; मोदी सरकारची कबुली

वर्षभरात केंद्राची कमाई प्रति लिटर पेट्रोलमागे १३ रुपयांनी तर डिझेल मागे १६ रुपयांनी वाढली

प्रातिनिधिक फोटो

सोमवारीही पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग १६ व्या दिवशी वधारलेलेच दिसून आले. असं असतानाच दुसरीकडे इंधनविक्रीमधून केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात महसूल कमवत असल्याचा खुलासा खुद्द केंद्रानेच केला आहे. अबकारी कर, उपकर आणि अधिभार या माध्यमातून इंधनविक्रीमधून केंद्राची घसघशीत कामाई होत असल्याची कबुली सरकारने दिली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ६ मे २०२० पासून प्रति लिटर पेट्रोलमागे ३३ रुपये तर प्रति लिटर डिझेल मागे ३२ रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होत आहेत. ही कमाईची आकडेवारी अबकारी कर, उपकर आणि अधिभार या तिन्ही गोष्टी मिळून आहे. २०२० साली मार्च आणि मे महिन्यादरम्यानच्या दरांशी तुलना केल्यास या कालावधीमध्ये केंद्र सरकारला प्रति लिटर पेट्रोलमागे २३ रुपये तर डिझेलमागे १९ रुपये महसूल म्हणून मिळायचे.

आकडेवारीचा अभ्यास केल्यास असं दिसून येतं की, १ जानेवारी २०२० ते १३ मार्च २०२० दरम्यान केंद्र सरकार प्रति लिटर पेट्रोल मागे २० रुपये तर प्रति लिटर डिझेल मागे १६ रुपये महसूल कमावायचे. म्हणजेच १ जानेवारी २०२० च्या आकडेवारीशी तुलना केल्यास सध्या सरकारने प्रति लिटर पेट्रोल मागील कमाई १३ रुपयांनी तर प्रति लिटर डिझेल मागील कमाई १६ रुपयांनी वाढलीय.

इंधनदरवाढीवरुन मागील काही काळापासून सरकारवर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. केंद्र सरकारकडून इंधनावर जास्त कर आकारला जात आहे तसेच पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर केंद्राने तेथील किंमती वाढू दिलेल्या नाहीत असा आरोप केला जातोय. त्यामुळे निवडणुकानंतर या राज्यांमध्ये इंधनदरवाढीचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

लोकसभेमध्ये इंधनदरवाढीसंदर्भात बोलताना अर्थमंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी, इतर देशांच्या तुलनेमध्ये आपल्या देशामध्ये पेट्रोलीयम पदार्थांचे दर कमी किंवा अधिक असतात यामागे अनेक कारणं आहेत. सध्या असणारी कर रचना, प्रत्येक सरकारकडून देण्यात येणारी सबसीडी यासारख्या गोष्टींबरोबरच सरकारने नमूद न केलेल्या इतर गोष्टींचाही या दरांवर परिणाम होतो, असं स्पष्ट केलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील किंमतीप्रमाणे देशातील किंमती ठरत असतात असंही सांगण्यात येत आहे.

इंधनाचे दर अधिक असल्याचे समर्थन करताना ठाकूर यांनी, “सध्याची वित्तीय तूट पाहता अबकारी कराच्या माध्यमातून केंद्र सरकारला बांधकाम आणि इतर विकास कामांसाठी निधी उभारण्यासाठी मदत होते,” असं मत नोंदवलं होतं. मात्र असं असलं तरी जागतिक बाजारपेठेवर देशातील इंधानाचे दर ठरत असले तरी इंधनाचे दर मागील दोन आठवड्यांपासून नियंत्रित कसे आहेत यासंदर्भात सरकारडून काहीही माहिती दिली जात नाहीय, असं इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकारने इंधन आणि पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या अंतर्गत आणण्याचा कोणताही विचार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 8:53 am

Web Title: centre admits to earning rs 33 per litre from petrol rs 32 from diesel scsg 91
Next Stories
1 लष्कर भरती भ्रष्टाचारप्रकरणी पाच अधिकाऱ्यांवर गुन्हा
2 राज्यांना आठवड्याची मुदतवाढ
3 प. बंगालमध्ये प्रचारभडका
Just Now!
X