News Flash

२१ सप्टेंबरपासून सुरू होणार ‘या’ इयत्तांच्या शाळा; केंद्राकडून नियमावली जाहीर

विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मार्गदर्शन घेता येणार

संग्रहित छायाचित्र

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. लॉकडाउनदरम्यान देशातील सर्व उद्योगधंदे, तसंच शाळा, महाविद्यालयंही बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला होता. परंतु आता देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, २१ सप्टेंबरपासून शाळा अंशतः सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यासाठी केंद्रानं नवी नियमावली जारी केली आहे. २१ सप्टेंबरपासून इयत्ता नववी पासून १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा अटी शर्थींसह उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु विद्यार्थ्यांना शाळेत जायचं आहे की नाही हे ऐच्छिक असणार आहे. यादरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्येकामध्ये कमीतकमी ६ फुटांचं अंतर ठेवावं लागणार आहे. तसंच मास्कदेखील अनिवार्य असणार आहे. याव्यतिरिक्त कंटेन्मेंट झोनमधील शाळा उघडण्यास मात्र परवानगी देण्यात आली नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच नियमावलीत ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निंगही सुरू राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. शाळांना जास्तीतजास्त ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे. नववी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी शाळेत जायचं असेल तर त्यांना परवानगी असेल. परंतु त्यांना आपल्या पालकांकडून लेखी स्वरूपात परवानगी घेणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे ऑनलाइन शिक्षणाचा पर्यायही उपलब्ध असेल.

दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचं अंतर राहिल अशी व्यवस्था शाळांना करावी लागणार आहे. तसंच खेळ किंवा विद्यार्थी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. संक्रमणाचा धोका वाढू शकतो म्हणून खेळांना आणि विद्यार्थ्यांच्या एकत्र येण्याला परवानगी नसेल. याव्यतिरिक्त शाळांमध्ये राज्यातील हेल्पलाईन क्रमांक आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांचे नंबरही डिस्प्ले करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. कंन्टेन्मेंट झोनच्या जवळ राहणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. तसंच ज्या शाळांचा क्वारंटाइन सेंटर म्हणून वापर करण्यात आला होता त्या सुरू करण्यापूर्वी योग्यरित्या सॅनिटाईझ करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 8:18 am

Web Title: centre issues sop for partial reopening of schools for classes 9 to 12 from 21 september unlock 4 jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चीनने अपहरण केलेले पाच तरुण लवकरच भारताच्या ताब्यात
2 शैक्षणिक संस्था २१ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करा
3 ताबारेषेवर स्फोटक स्थिती
Just Now!
X