केंद्र सरकारने बँक खात्याशी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची ३१ डिसेंबरची मुदत मागे घेतली आहे. अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागाने मंगळवारी यासंबंधीचे परिपत्रक काढले असून पुढील मुदत चर्चेअंती ठरवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे लाखो लोकांना दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र सरकारने सर्व कामांसाठी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. नुकताच सरकारने बँक खात्याशी आधार लिंक करण्याची अखेरची मुदत वाढवून ३१ मार्च २०१८ केली होती. त्यापूर्वी आधार आणि बँक खाते लिंक करण्याची अखेरची मुदत ही ३१ डिसेंबर २०१८ होती. आता नवीन मुदतही हटवण्यात आली आहे. आता बँक खात्याशी आधार लिंक करण्याची कोणतीच मुदत नाही. अंतिम मुदत काय असेल याबाबत सरकारकडून नंतर माहिती देण्यात येईल. त्याचबरोबर इतर ठिकाणी आधार लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आलेली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाकडून ३३ कोटी पॅन कार्ड वितरीत करण्यात आले असून त्यापैकी ४१ टक्के म्हणजे १४ कोटी पॅनकार्ड आधार कार्डबरोबर लिंक झाले आहेत. तर ११५ कोटी लोकांकडे आधार कार्ड आहे.

दरम्यान, ८ डिसेंबरला सरकारने आधारला पॅन कार्डशी लिंक करण्याची अखेरची मुदत वाढवून ती ३१ मार्च २०१८ करण्यात आली होती. पॅन कार्डशी आधार लिंक केल्याशिवाय पुढच्या वर्षी कर भरता येणार नाही. दरम्यान, यावर्षीही ज्या लोकांनी आधार-पॅनला लिंक केले नव्हते. त्यांना कर जमा करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. या निर्णयामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गुरूवारी आधारबाबत सर्वोच्च न्यायालयात एक महत्वाची सुनावणी होणार आहे. ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही, सरकार त्यांच्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१७ ऐवजी ३१ मार्च २०१८ पर्यंत करत असल्याचे मागील सुनावणीवेळी केंद्र सरकारकडून अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यासाठी शुक्रवारी परिपत्रक जारी केले जाईल. दरम्यान, मोबाइलला क्रमांकाला आधार क्रमांक जोडण्याची मुदत ६ फेब्रुवारी २०१८ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही मुदत वाढवली जाणार नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Centre removes december 31 deadline to link aadhaar with bank accounts
First published on: 13-12-2017 at 16:36 IST