देशात करोना विषाणूनं थैमान घातलं आहे. दिवसाला ८० ते ९० हजार रुग्ण आढळून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील रुग्णसंख्येचा आलेख प्रचंड वेगानं वाढताना दिसत असून, एकूण रुग्णांची संख्या ५३ लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील वाढत्या करोना रुग्णसंख्येवर दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी भाष्य केलं आहे.

दिल्लीसह देशातील करोनाचा प्रसार अद्यापही नियंत्रणात आलेला नाही. उलट गेल्या काही आठवड्यांपासून बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्ली आणि देशातील करोना परिस्थितीवर मत व्यक्त केलं.

जैन म्हणाले,”जेव्हा दिल्लीत आणि देशातील इतर भागांमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं लोकांना संसर्ग होत आहे. तेव्हा करोनाचा समूह संसर्ग झालेला आहे, हे स्वीकारायला हवं. पण आयसीएमआर आणि केंद्र सरकारचं समूह संसर्ग झाल्याचं सांगू शकते,” असं जैन यांनी सांगितलं.

“मी कशावर विश्वास ठेवतो हे महत्त्वाचं नाहीये. या गोष्टीत मी तांत्रिकदृष्ट्या पात्रही नाही. पण, तांत्रिकदृष्ट्या हा समूह संसर्ग आहे. मी असं म्हणू शकतो की, समूह संसर्ग समाजात पसरला आहे. समूह संसर्ग ही तांत्रिक संकल्पना असून, त्याबद्दल वैज्ञानिक सांगू शकतात,” असं जैन म्हणाले.

समूह संसर्ग कसा होतो?

करोनाचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होतो. करोना साथीच्या प्रसाराचे चार टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे बाधित देशातून आलेल्या प्रवाशांना करोनाचा संसर्ग झालेला असणे. या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही करोनाची लागण होते. हा दुसरा टप्पा असून स्थानिक प्रसार (लोकल ट्रान्समिशन)असे म्हणतात. तिसऱ्या टप्प्यात प्रवास न केलेल्या किंवा प्रवाशांच्या संपर्कात न आलेल्या व्यक्तींना संसर्गाची लागण होण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने दिसायला लागते. अशा परिस्थितीमध्ये संसर्ग स्थानिक भागातून समाजामध्ये पसरत चालला असल्याचे स्पष्ट होते. या टप्प्यात समाजामध्ये संसर्गाचा प्रसार कसा, कुठे आणि कशाप्रकारे होत आहे, याचा माग लावणे कठीण होते. यात एका विशिष्ट भौगोलिक भागामध्ये उदारहणार्थ, विभाग, शहर, जिल्हा यात मोठ्या प्रमाणात असे रुग्ण आढळून येतात. तेव्हा समूह प्रसार झाल्याचे नोंदवले जाते.