लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे घोडामैदान जवळ आलेले असतानाच एनडीएतील दोन घटकपक्षांची नाराजी समोर आल्याने भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेने स्वबळाची घोषणा करत आधीच वेगळी वाट निवडली आहे. यात भरीस भर म्हणून आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही अर्थसंकल्पावर नाराजी दर्शवत एनडीएला सोडचिठ्ठी देण्याचे ठरवल्याचे समजते आहे. अशात या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये म्हणजेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि चंद्राबाबू नायडू यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चर्चेमुळे भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात असो किंवा केंद्रात शिवसेनेला भाजपाकडून मिळणारी वागणूक ही दुय्यम राहिली आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यात विस्तव जात नाहीये हे महाराष्ट्राने पाहिले आहेच. तरीही या घडीला सत्ता न सोडण्याचे शहाणपण शिवसेनेने दाखवले आहे. २०१९ मध्ये जेव्हा राज्यात दोन्ही पक्ष स्वबळ आजमावतील तेव्हा कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली असेल. समविचारी पक्षांनी सरकारविरोधात एकत्र आले पाहिजे अशी भूमिका काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी मांडली होती. त्यामुळे भाजपा आणि शिवसेना यांनी स्वबळ आजमावले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली तर त्याचा मोठा फटका या दोन्ही पक्षांना बसू शकतो.

शिवसेनेची नाराजी सहन करत असतानाच एनडीएतला आणखी एक घटक पक्ष म्हणजेच तेलगु देसम पार्टीही नाराज आहे. चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करण्यासाठी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे कारण शोधले आहे. अर्थसंकल्पात आंध्रप्रदेशाला काहीही मिळाले नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आगामी निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातून शिवसेना आणि आंध्र प्रदेशातून तेलगु देसम जर एनडीएतून बाहेर पडले किंवा नाराज राहिले तर त्याचा मोठा फटका भाजपाला बसू शकतो. अशा पार्श्वभूमीवर चंद्राबाबू नायडू आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. ही चर्चा नेमकी काय होती ते समजू शकलेले नाही तरीही भाजपाविरोधात रणनीती ठरवण्याबाबत जर हे दोन नेते एकमेकांशी बोलले असतील तर भाजपासाठी ही चांगली बातमी नाही असेच म्हणावे लागेल. या दोघांची नाराजी दूर करणे हे आता भाजपासमोरचे आव्हान असू शकते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.