आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) भारतीय जनता पक्षाबरोबर (भाजप) युती करण्याचा निर्णय घेतला आहे.  राजधानी दिल्लीत रविवारी या नव्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
सत्तेचा राजगड जिंकायचा असेल, तर एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, हे राजकीय पक्षांना आता चांगलेच समजलेले आहे. त्यामुळे, टीडीपी अध्यक्ष चंद्रबाबू नायडू आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी आज (रविवार) संयुक्त पत्रकार परिषद घेत आपला युतीचा निर्णय जाहिर केला. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये भाजप आणि चंद्रबाबू नायडूंचा देसम पक्ष युती करणार असल्याची चर्चा सुरु होती.. मात्र, जागावाटपांमुळे या युतीमध्ये पेच निर्माण झाला होता. पण, हे पेच आता अखेर सुटत या दोन्ही पक्षांनी युती केली आहे.
तेलंगण आणि सीमांध्रमध्ये लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या दोन्ही राज्यात तेदप हा महत्त्वाचा पक्ष असेल. तेलंगणमध्ये तेदप ७२ विधानसभा व १० लोकसभा तर सीमांध्रमध्ये १६० विधानसभा व १० लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवेल. भाजपच्या वाट्याला तेलंगणमध्ये ४७ विधानसभा, ८ लोकसभा आणि सीमांध्रमध्ये १५ विधानसभा व ५ लोकसभेच्या जागा येणार आहेत. तेलंगणमध्ये ३० एप्रिल रोजी तर सीमांध्रमध्ये ७ मेरोजी विधानसभा निवडणूक होणार आहे.