चांद्रयान-२ मोहिमेत पाठिशी उभे राहिल्याबद्दल देशवासियांचे आभार मानल्यानंतर इस्रोने आज ऑर्बिटरच्या प्रकृतीची माहिती दिली. ऑर्बिटरच्या पेलोडवर करण्यात आलेले प्रारंभिक प्रयोग यशस्वी ठरले आहेत. सर्व पेलोडसची कामगिरी समाधानकारक आहे असे इस्रोने टि्वटमध्ये म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चांद्रयान-२ चा ऑर्बिटर ठरल्याप्रमाणे सर्व वैज्ञानिक चाचण्या करत आहे. ऑर्बिटरमध्ये आठ अत्याधुनिक पेलोड आहेत. ज्यावरुन चंद्राचा नकाशा तयार करण्यात येईल तसेच चंद्रावर पाणी, बर्फ, खनिजांचा शोध घेतला जाईल. विक्रम लँडरबरोबर संपर्क का तुटला? ते शोधून काढण्यासाठी इस्रोच्या तज्ञांची समिती त्यावर काम करत असल्याची माहिती टि्वटमधून देण्यात आली आहे.

VIDEO ऑर्बिटरला चंद्राच्या आणखी जवळ नेणार ?

चांद्रयान-२ मोहिमेतील लँडरशी संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या कक्षेत फिरत असलेला ऑर्बिटर निर्णायक ठरेल असा विश्वास काही दिवसांपूर्वी इस्रोचे प्रमुख सिवान यांनी व्यक्त केला होता. ऑर्बिटरचे वाढलेले आयुष्य चांद्रयान-२ मोहिमेच्या पथ्यावर पडणारे असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. आधी ऑर्बिटरचे आयुष्य एक वर्ष असणार होते. पण जीएसएलव्ही प्रक्षेपकाने ऑर्बिटरला अचूक कक्षेत प्रस्थापित केले तसेच त्यामध्ये इंधन जास्त असल्यामुळे ऑर्बिटर आणखी सात वर्ष कार्यरत रहाणार आहे. पाण्यासंदर्भात महत्वपूर्ण शोध ऑर्बिटरच्या माध्यमातून लागू शकतो.

ऑर्बिटरमुळे चंद्रावर बर्फ आणि पाणी शोधून काढण्याची संधी आहे. चंद्राच्या पृष्ठभागाखाली १० मीटरपर्यंत गोठलेले पाणी पाहण्याची क्षमता आमच्याकडे आहे. आपण इतिहास घडवू असा विश्वास सिवन यांनी व्यक्त केला. ऑर्बिटरची कक्षा बदलून त्याला चंद्राच्या आणखी जवळ नेण्याचा इस्रोमध्ये विचार सुरु असल्याचे एका वैज्ञानिकाने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले होते.

लोअर ऑर्बिटमधून कॅमेऱ्याचा पुरेपूर वापर करण्याची योजना आहे. चंद्रापासून ५० किलोमीटरच्या कक्षेत गेलो तर फोटो अजून चांगले मिळतील. अजून यासंबंधी कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. ऑर्बिटरचे साडेसात वर्षांचे आयुष्य असल्यामुळे आम्हाला संधी आहे. ऑर्बिटरमध्ये हाय रेसोल्युशनचे उत्तम कॅमेरे बसवलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण चंद्रभूमीची माहिती मिळवता येईल असे सिवन यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 2 isro update about orbiter health dmp
First published on: 19-09-2019 at 20:03 IST