‘चांद्रयान-२’ने सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला. महत्त्वकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे. ७ सप्टेंबरला चांद्रयान-२ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, अशी माहिती इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी मंगळवारी दिली.

भारताच्या अवकाश मोहिमेतील चांद्रयान-२ ही महत्त्वाची मोहीम आहे. २२ जुलैला श्रीहरिकोटातील प्रक्षेपण केंद्रावरून चांद्रयान-२ चंद्राच्या दिशेने झेपावले होते. चांद्रयानाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती इस्त्रोकडून देण्यात येत होती. दरम्यान, २९ दिवसांनी मंगळवारी सकाळी ९:३० वाजता चांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत दाखल झाले. त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख के. सिवन यांनी पत्रकार परिषद घेऊन मोहिमेच्या पुढील टप्प्याची माहिती दिली.

सिवन म्हणाले, चांद्रयान-२ मोहिमेने एक मैलाचा दगड पार केला आहे. सकाळी साडेनऊ वाजता चंद्राच्या कक्षेत स्थिरावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि त्यानंतर अपेक्षित कक्षेत ते दाखल झाले आहे. हा या मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा होता. पुढील महत्त्वाची घटना २ सप्टेंबर रोजी घडणार आहे. लँडर कक्षेतून वेगळे होणार असून ३ सप्टेंबर रोजी लँडरची प्रणाली सर्वसामान्यपणे कार्यान्वित होण्यासाठी ३ सेकंदाचा वेळ लागणार आहे. ७ सप्टेंबर रोजी सकाळी १.५५ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. हा क्षण बघण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोच्या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. चांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याचा टप्पा अतिशय महत्त्वाचा होता. हा क्षण आमच्यासाठी भयानक होता. चांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत प्रवेश करीत असताना आमचा श्वास रोखला गेला होता, असेही के. सिवन म्हणाले.