इनामासाठी कट रचल्याचा लष्करी अधिकाऱ्यावर ठपका

शोपियाँ : गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात काश्मीरमधील शोपियाँ येथे झालेल्या कथित बनावट चकमकीत सहभागी असलेल्या लष्कराच्या कॅप्टनने २० लाख रुपयांचे इनाम ‘हस्तगत करण्याच्या’ उद्देशाने दोन नागरिकांसोबत कट रचला आणि लष्कराच्या जवानांनी या भागाला वेढा घालण्यापूर्वीच बळींवर गोळीबार केला होता, असे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. या बनावट चकमकीत तीन युवक ठार झाले होते.

आरोपी कॅप्टन भूपिंदर सिंग हे सध्या लष्कराच्या  कोठडीत असून, त्यांना कोर्ट मार्शलच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

१८ जुलै २०२० रोजी येथील अमशिपुरा भागात झालेल्या चकमकीशी संबंधित या प्रकरणात राजौरी जिल्ह्य़ातील इम्तियाझ अहमद, अब्रार अहमद आणि मोहम्मद इब्रार हे तीन युवक मारले गेले होते व ते दहशतवादी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

शोपियाँच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या या आरोपपत्रात तबीश नझीर व बिलाल अहमद लोन या दोन नागरिकांच्या या प्रकरणातील सहभागाचीही तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. लोन हा त्यानंतर माफीचा साक्षीदार बनला असून त्याने  दंडाधिकाऱ्यांपुढे त्याचा कबुलीजबाब नोंदवला आहे. हे तीन युवक दहशतवादाशी संबंधित नव्हते असे वृत्त समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर लष्कराने याप्रकरणी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चा आदेश दिला होता. त्यांनी सप्टेंबरमध्ये चौकशी पूर्ण केली होती. सशस्त्र दले विशेषाधिकार कायद्यान्वये (आफस्पा) देण्यात आलेल्या अधिकारांचा फौजांनी प्रमाणाबाहेर वापर केल्याचा ‘सकृतदर्शनी’ पुरावा या चौकशीत  आढळला होता. यानंतर लष्कराने शिस्तभंगाची कारवाई सुरू केली होती.

अमशिपुरामध्ये ठार झालेल्या तीन युवकांची  ओळख डीएनए चाचणीतून निश्चित करण्यात आली  व त्यांचे मृतदेह ऑक्टोबरमध्ये त्यांच्या नातेवाईकांना सोपवण्यात आले. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने दाखल केलेल्या या आरोपपत्रात त्यांच्या निष्कर्षांच्या पुष्टय़र्थ ७५ साक्षीदारांची यादी देण्यात  आली आहे.