जॉन्सन टी. ए., एक्स्प्रेस वृत्तसेवा,

बंगळुरू : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार जणांच्या घरातून तपास अधिकाऱ्यांना हस्तलिखितांच्या नोंदी असलेल्या तीन डायऱ्या मिळाल्या आहेत. यामध्ये लंकेश यांच्या घराचा रेखाटलेला नकाशा आणि हत्या कशी करता येईल यासंबंधी आखलेला प्लॅन यामध्ये नोंद केलेला आहे. बुधवारी लंकेश हत्याप्रकरणी विशेष तपास पथकाने ६५० पानांचे आरोपपत्र दाखल केले.

लंकेश यांची जेथे हत्या झाली तो मार्ग दर्शविणारा नकाशा आणि शेजारी कोण राहतात याच्या नोंदी असलेली डायरी एका आरोपीच्या घरातून मिळाली आहे, असे सूत्रांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. सदर चार जण सनातन संस्था आणि त्यांच्याशी संबंधित हिंदू जनजागृती समितीशी संबंधित आहेत. सुजितकुमार ऊर्फ प्रवीण, अमोल काळे उर्फ भाईसाहेब, अमित डेगवेकर ऊर्फ प्रदीफ आणि मनोहर इडावे अशी या चौघांची नावे आहेत. सदर डायऱ्यांमध्ये सांकेतिक भाषेतील संदेश होता, लंकेश यांच्या घराच्या ठिकाणाचा नकाशा मिळाल्याने विशेष तपास पथकाला त्यांना ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरू करणे शक्य झाले. भगवान यांच्या हत्येचा कट आखल्याप्रकरणी चारही संशयितांना बुधवारी न्यायालयीन कोठडी देण्यात आली.