महाराष्ट्राच्या कडेकपारीत ज्यांच्या नावाचा अखंड गजर होतो अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून रयतेच्या राजाला विनम्र अभिवादन केले आहे. मोदींनी एक व्हिडिओ पोस्ट करत महाराजांच्या जयंतीनिमित्त एक महत्त्वाचा संदेशही दिला आहे. त्यांच्यासारखे शूर आणि महान व्यक्तीमत्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान आहे, असे ते या व्हिडिओत म्हणत असून, शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही, हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रनिर्माणाची मुहूर्तमेढ महाराजांनी जवळपास साडेतीनशे वर्षांपूर्वीच रोवली होती. पिढ्यानपिढ्या महाराज आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. हेसुद्धा तितकच खरं आहे, पुन्हा शिवाजी होणे नाही. शिवाजी महाराजांच्या रुपात पुन्हा असा राजा झाला नाही तरी शिवाजी ऐवजी देशातील सव्वाशे कोटी जनतेला त्यांनी ‘सेवाजी’ होण्याचे आवाहन केले.

दरदिवशी प्रत्येक भारतीयाने किमान एका व्यक्तीची सेवा करावी, तरच या सेवेच्या माध्यमातून आपण महाराजांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करु शकतो, असं ते एका भाषणात म्हणाले होते, ज्याची काही दृश्येही या व्हिडिओत जोडण्यात आली आहेत. या व्हिडिओमध्ये एकिकडे मोदींच्या भाषणातील काही ओळींचा सुरेख वापर करण्यात आला आहे, तर त्याला ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा जयघोषाचीही जोड देण्यात आली आहे.

अडीच एकरांवर साकारण्यात आली शिवरायांची महारांगोळी

समृद्ध आणि कणखर महाराष्ट्राचा पाया रचणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आज मानवंदना वाहण्यात येत असून, विविध माध्यमातून अनेकांनीच या राजाचं राजेपण जपत त्यांना अभिवादन केल्याचे पाहायला मिळत आहे.