राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट आता भाजपामध्ये असल्याचं छत्तीसगडमधील काँग्रेसचे प्रभारी पी एल पुनिया यांनी सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे सचिन पायलट यांनी आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचं सांगितलेलं असतानाच पी एल पुनिया यांनी हे वक्तव्य केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सचिन पायलट यांनी रविवारी आपल्याला पक्षाच्या ३० आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे.

“सचिन पायलट आता भाजपात आहेत. प्रत्येकाला भाजपा काँग्रेसबद्दल काय विचारं करत याची माहिती आहे. आम्हाला भाजपाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. काँग्रेस पक्षात सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो,” असं पी एल पुनिया यांनी म्हटलं आहे.

सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण हाती घेतलं असून भाजपात प्रवेश करणार असल्यच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र सचिन पायलट यांनी आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचं सांगितलं आहे. सचिन पायलट भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार असून यावेळी त्यांच्या भाजपा प्रवेशाची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण सचिन पायलट यांनी एनडीटीव्हीशी बोलताना हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

काँग्रेसने सचिन पायलट यांचा दावा फेटाळून लावला असून आपल्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. रविवारी दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी रात्री २.३० वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसने आपल्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. जयपूरमध्ये अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद पार पडली.

विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे नी यावेळी सांगितलं की, “१०९ आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान सरकार तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे”.

काय घडू शकते?

– विधानसभेत १०७ एवढे संख्याबळ असलेल्या काँग्रेसला १३ अपक्षांसह भारतीय ट्रायबल पार्टीच्या दोन आणि राष्ट्रीय लोक दलाच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन आमदारांनी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा दिला आहे.
– काँग्रेसच्या दोन तृतीयांश म्हणजे १०७ पैकी ७२ आमदारांनी पक्षांतर केले, तर ते पक्षांतरबंदी कायद्यापासून वाचू शकतात. परंतु, एवढय़ा मोठय़ा संख्येने काँग्रेसचे आमदार फुटणे अशक्य असल्याचे मानले जाते.
– भाजपतर्फे सत्ता हस्तगत करण्यासाठी मध्य प्रदेशातील ‘सत्तासूत्रा’चा वापर केला जाऊ शकतो. पायलट यांच्या समर्थक आमदारांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला तर विधानसभेतील संख्याबळ कमी होईल. त्यानंतर ते आमदार भाजपमध्ये प्रवेश करून पोटनिवडणूक लढवू शकतात.
– काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संख्याबळात ५० सदस्यांचा फरक असल्याने भाजपच्या गळाला एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर काँग्रेसचे आमदार लागणे कठीण असल्याचे मानले जाते.

संख्याबळ

एकूण सदस्य- २००

काँग्रेस             १०७
भाजप              ७२
अपक्ष               १३
इतर पक्ष           ८