राजस्थानात काँग्रेसमध्ये राजकीय नाट्य रंगलेलं असताना छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी १५ आमदारांच्या संसदीय सचिव म्हणून नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला आहे. या आमदारांमध्ये बहुतांश आमदार नवीन आहेत. बघेल यांनी घेतलेल्या निर्णयावर भाजपानं टीका केली असून, राजस्थानात घडत असलेल्या घटनामुळे बघेल यांनी हा निर्णय घेतला आहे, अशी टीका भाजपानं केली आहे.

कर्नाटक, मध्य प्रदेशातील सत्ता गमवावी लागलेल्या काँग्रेससमोर राजस्थानमध्येही अस्थिरतेचं संकट उभं राहिल्याचं दिसून येत आहे. सचिन पायलट यांनी बंडांचं निशाण फडकावल्यानंतर राजस्थान काँग्रेसमध्ये उलथापालथ झाली. सचिन पायलट यांना पक्षानं उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर केलं आहे. राजस्थानात या घटना घडत असताना छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी १५ आमदारांच्या संसदीय सचिव म्हणून नियुक्त्या केल्या असून, त्यांना विविध खात्याशी जोडण्यात आलं आहे.

आणखी वाचा- …म्हणून मी बंड पुकारलं, सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच केलं जाहीर भाष्य

बघेल यांनी मंगळवारी या नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला. ज्यात १५ आमदारांना संसदीय सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. ज्या आमदारांना संसदीय सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यामध्ये बहुतांश आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. यात १० आमदार एससी-एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील आहेत. यातील चार जणांना गृहमंत्री ताम्रध्वज साहू आणि आरोग्य मंत्री टी.एस. सिंह देव यांच्या कार्यालयाशी जोडण्यात आलं आहे.

आणखी वाचा- भाजपा प्रवेशावर सचिन पायलट यांनी जाहीर केली भूमिका, म्हणतात…

बघेल यांच्या निर्णयावर भाजपाकडून टीका करण्यात आली आहे. यापूर्वी भाजपा सरकारनं अशा प्रकारचे निर्णय घेतले, त्यावेळी काँग्रेसनं याला विरोध केला. उच्च न्यायालयात आव्हान दिलं, असं भाजपानं म्हटलं आहे. भाजपाचे खासदार सुनील सोनी म्हणाले,”संसदीय सचिव म्हणून नियुक्त झालेल्या सर्व आमदारांनी सचिन पायलट यांचे आभार मानायला हवेत. ज्यांना काँग्रेसनं पदावरून दूर केलं. कारण त्यांनी पक्षासोबत असलेले मतभेद जाहीरपणे बोलून दाखवले,” असं सोनी म्हणाले. तर भाजपाचे नेते राजेश मुनत यांनी याविषयी भूमिका मांडताना सांगितलं की, “काँग्रेस जेव्हा विरोधी बाकांवर होती. तेव्हा अशाप्रकारच्या नियुक्त्यांना छत्तीसगढ उच्च न्यायालयात आव्हान द्यायची. आता काय झालं? मुख्यमंत्री बघेल यांनी मतभेद दूर करण्यासाठी नियुक्त्या केल्या आहेत,” अशी टीका मुनत यांनी केली.