निवडणुकीत बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे पुत्र माजी आमदार अमित जोगी यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. कारण, मंगळवारी सकाळी अमित जोगी यांना त्यांच्या बिलासपूर येथील निवासस्थानावरून पोलिसांनी अटक केली आहे.

बनावट प्रमाणपत्र प्रकरणी सोमवारी बिलासपूर जिल्हा पंचायतीच्या उपाध्यक्षा आणि भाजपा नेत्या समीरा पैकरा आणि मरवाही गावच्या आदिवासींनी अमित जोगींच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली होती. दरम्यान, ३ फेब्रुवारी रोजी मरवाहीचे माजी आमदार अमित जोगी यांच्याविरोधात गौरेला पोलीस ठाण्यात कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मरवाही विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार राहिलेल्या समीरा पैकरा यांनी तक्रार दाखल केली होती.

पैकरा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, अमित जोगी यांनी निवडणुकीच्यावेळी निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रात आपली जन्मतारिख आणि जन्मस्थळ चुकीचे सांगितले होते. यावरुन जोगी यांच्याविरोधात पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. निवडणूक हारल्यानतंर समीरा पैकरा यांनी हायकोर्टात याचिका दाखल करीत अमित जोगी यांची जात आणि जन्मतारिखेला आव्हान दिले होते.

यावर हायकोर्टाने चार दिवसांपूर्वी निर्णय दिला होता यामध्ये कोर्टाने म्हटले होते की, छत्तीसगड विधानसभा निवडणुका आता संपल्याने ही याचिका फेटाळण्यात येत आहे. यानंतर समीरा पैकरा यांनी गौरेला पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती.

पैकरा यांच्या तक्रारीनुसार, अमित जोगींनी प्रतिज्ञापत्रात आपला जन्म सन १९७८ मध्ये सारबहरा गौरेला येथे झाल्याचे म्हटले होते. मात्र, जोगींचा जन्म १९७७ मध्ये अमेरिकेतील टेक्सास प्रांतातल्या डगलास येथे झाला आहे.