छत्तीसगढ येथे होणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुकीवर नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचे सावट आहे. मात्र त्यावर मात करण्यासाठी केंद्रीय तसेच राज्य निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजनांचा विचार करण्यात येत आहे. मतदान यंत्रे नक्षलवाद्यांकडून पळविली जाण्याची शक्यता लक्षात घेत आयोगाने ही यंत्रे तसेच मतदान केंद्रांवरील कर्मचारी यांना हेलिकॉप्टरद्वारे स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
छत्तीसगढमधल्या ३३९ मतदान केंद्रांवर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरद्वारे त्या त्या ठिकाणी सोडण्यात येईल. तसेच मतदान झाल्यानंतरही मतदान यंत्रे हेलिकॉप्टरद्वारेच मोजणी करण्याच्या स्थानी हलविण्यात येतील, असे उपमुख्य निवडणूक अधिकारी अ‍ॅलेक्स पॉल मेनन यांनी स्पष्ट केले.
राज्यातील निवडणुका मुक्त आणि पारदर्शक व्हाव्यात यासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येणार असली तरी यासाठी नेमकी किती हेलिकॉप्टर वापरली जाणार आहेत ही बाब अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. ११ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त अशा बस्तर जिल्ह्य़ातील १८ मतदारसंघांतील १४३ उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार आहे. या भागात एकूण ४१४२ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हवाई दलाकडे १५ हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. तसेच १६७ मतदान केंद्रांचे ठिकाण सुरक्षिततेच्या कारणास्तव बदलले गेले आहे.