छत्तीसगडमधील बिजापूर येथे सहा नक्षलवाद्यांनी बुधवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे यातील चार जणांवर लाखोंचे बक्षीस ठेवण्यात आलेले होते. आत्मसर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक प्लाटून कमांडर, एक डेप्युटी कमांडरसह दोन महिला नक्षलींचा समावेश आहे. हे सर्वजण बिजापूर जिल्ह्यातील फरसेगढ आणि नेलसनार क्षेत्रात सक्रीय होते. पोलीस अधीक्षक आणि सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांनी आत्मसर्पण केले.

नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सध्या आयजी विवेकानंद सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली बस्तर येथे अभियान राबवले जात असल्याची पोलीस अधीक्षक दिव्यांग पटेल यांनी माहिती दिली आहे. या अभियानांतर्गतच माड विभागात सक्रीय असलेल्या नक्षलींच्या तुकडीचा कमांडर दिलीप वड्डे उर्फ चिन्ना याने एके-47 रायफलसह पोलीस ठाण्यात येऊन आत्मसमर्पण केले. त्याच्यावर तब्बल आठ लाख रूपयांचे बक्षीस होते.

चिन्ना हा २००३ पासून नक्षली संघटनेत सक्रीय होता. विविध ठिकाणच्या लुटमारीसह हल्ल्यांच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. याशिवाय मडकम बंडी उर्फ बंडू हा देखील माड विभागात नक्षली कारवायांमध्ये सक्रीय होता. त्याने देखील एसएलआर रायफलसह आत्मसमर्पण केले. तो नक्षलवाद्यांच्या संघटनेत डेप्युटी कमांडर होता व त्याच्यावर देखील आठ लाख रूपयांचे बक्षीस होते. २०१० पासून तो नक्षलवाद्यांच्या संघटनेत सक्रीय होता. बिजापूर आणि नारायणपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्ह्यांचा नोंद आहे.
या दोघांसह सनकी वड्डे उर्फ सुजाता, बुदरी उसेण्डी उर्फ गुड्डी, महेश वासम आणि विनोद मेट्टा या नक्षलवाद्यांनी देखील आत्मसमर्पण केले आहे. यातील सुजातावर दोन लाखांचे आणि बुदरी वर एक लाख रुपयांचे बक्षीस होते. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये दोन विवाहीत जोडप्यांचा समावेश आहे.