काश्मीर खोऱ्यात ‘छोटा डॉन’ म्हणून कुख्यात असलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन पोलिसांनी बालसुधारगृहात पाठवले आहे. काश्मीर खोऱ्यात दगडफेक करणाऱ्या मुलांच्या गटात सहभागी झाल्यानंतर तो ‘छोटा डॉन’ म्हणून ओळखला जाऊ लागला. वयाच्या १० व्या वर्षी हा मुलगा सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्या मुलांच्या संपर्कात आला.

अलीकडेच या मुलाने शोपियनमध्ये शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा मार्ग रोखला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या मुलाला जेव्हा पकडले तेव्हा त्याच्या हातात असलेली काठी त्याच्या उंचीपेक्षा मोठी होती. तो कामावर जाणारे सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांचे आयडी कार्ड तपासत होता अशी माहिती शोपियनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संदीप चौधरी यांनी दिली.

२०१६ साली काश्मीर खोऱ्यात हिंसक विरोध प्रदर्शन सुरु असताना या मुलाला अनेकदा पाहण्यात आले. तो दगडफेक करणाऱ्या जमावासोबत असायचा. ही मुले त्याच्यापेक्षा दुप्पट वयाची होती असे सूत्रांनी सांगितले. आपण हे का करतोय? काश्मीरचे मुद्दे काय आहेत?, कलम ३७० म्हणजे काय? याबद्दल या मुलाला काहीही माहित नाही असे पोलिसांनी सांगितले.