सर्वोच्च न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीप्रसंगी सरन्यायाधीश रंजन गोगई आणि ज्येष्ठ वकील राजीव धवन यांच्यात झालेल्या एका संवादाची मोठी चर्चा होताना दिसत आहे. जेव्हा आपण खुर्चीवरून उठतो. तेव्हा पुन्हा वकिलांशी बोलत नाही, असे सरन्यायाधीशांनी धवन यांना म्हटले. ते म्हणाले की, आम्ही उभे राहून वकिलांशी बोलत नाही. आम्ही बसतो, मग बोलतो. हीच आमची पद्धत आहे.

जेवणाच्या सुटीपूर्वी सरन्यायाधीश जागेवरून उठत होते. त्यावेळी वकील राजीव धवन हे एका प्रकरणाबाबत बोलणार होते. पण तोपर्यंत सरन्यायाधीश जागेवरून उठले होते. तेव्हा धवन यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी न्या. गोगई हे चेंबरमध्ये गेले. भोजनानंतर जेव्हा सरन्यायाधीश पुन्हा आले तेव्हा त्यांनी म्हटले की, श्रीमान धवन तुम्हाला काहीतरी बोलायचे होते ? तेव्हा धवन म्हणाले की, नाही माय लॉर्ड काही नाही. मी खटल्याचे मेन्शनिंग करू इच्छित होतो. पण तुम्ही निघून गेले होते. अशात मला आता काही म्हणायचे नाही.

यावर सरन्यायाधीश म्हणाले की, मी आधीच जागेवरून उठलो होतो. तेव्हा तुम्ही प्रकरण मेन्शन केले होते. एकदा उठल्यानंतर बोलणे ठीक नव्हते. त्यावेळी धवन म्हणाले की, काय योग्य होते आणि काय नाही हे मला माहीत नव्हते. पण अनेक सरन्यायाधीशांची पद्धत वेगळी होती.

यावर सरन्यायाधीश गोगई म्हणाले, मी उभा राहून बोलत नाही. बसल्यानंतरच बोलतो. हीच आमची पद्धत आहे. यावर धवन यांनी याबाबत आम्हाला सांगायला पाहिजे होते, असे म्हटले.