कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा मानला जातो. यामध्ये देशातूनच नाही तर परदेशातूनही लाखो लोक उपस्थित असतात. इतक्या प्रचंड प्रमाणात लोक एकत्र आल्याने याठिकाणी अक्षरश: गोंधळाचे वातावरण निर्माण होते. या गदारोळात लहान मुले हरवण्याचे प्रमाण जास्त असते. मग पालकांना आपल्या मुलांना शोधताना अक्षरश: तारांबळ उडते. यासाठी आता प्रशासनाने एक उत्तम उपाय शोधून काढला आहे. १४ वर्षांहून लहान असलेल्या मुलांना रेडियो फ्रीक्वेन्सी ओळखपत्र दिले जाणार आहे. ५० दिवस चालणाऱ्य या मेळ्यात १२ कोटीहून अधिक लोकांचा सहभाग असेल असे पोलिस महानिरीक्षक ओपी सिंह यांनी सांगितले. एकप्रकारचे टॅग मुलांच्या कपड्याला लावले जाईल. त्यामुळे मूल हरवले तरीही ते कुठे आहे हे समजू शकणार आहे.

लहान मुलांची हरवाहरवी होऊ नये यासाठी वोडाफोन कंपनीची मदत घेतली जाणार आहे. लहान मुलांसाठी ४० हजार रेडियो फ्रीक्वेन्सी ओळखपत्रे तयार केली जाणार आहेत. यामाध्यमातून वायरलेस पद्धतीचा वापर करुन मुलांना शोधणे सोपे होणार आहे. एखादी वस्तू किंवा व्यक्ती यांचा शोध घ्यायचा असल्यास या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या संपूर्ण मेळ्याच्या भागात १५ आधुनिक अशी केंद्रे उभारण्यात आली आहेत. याठिकाणी एका डिस्प्लेच्या माध्यमातूनही सूचना देण्यात येणार आहेत. अशाप्रकारे लहान मुलांना शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान पहिल्यांदाच वापरले जाणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्यात कोणाचे मूल हरवले तरीही चिंता करु नका कारण या प्रणालीमुळे ते तुम्हाला सहज सापडू शकणार आहे.