चीनी सैनिकांनी सीमारेषा पार करुन भारतात घुसखोरी केल्याचं समोर आलं आहे. चीनी सैंनिकांना लडाखमध्ये सीमारेषा पार करुन सहा किमी आतमध्ये आल्याचं पाहण्यात आलं आहे. सीएनएन न्यूज १८ ने एका फोटोच्या हवाल्याने दावा केला आहे की, ६ जुलै रोजी चीनी सैनिक डेमचोक, कोयूल आणि डुंगटी परिसरात घुसले होते. यावेळी भारतीय जमिनीवर चीनी झेंडे फडकावण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे अशावेळी सीमारेषा पार करुन घुसखोरी करण्यात आली जेव्हा लदाखमधील काही लोक बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करत होते. याचवेळी चीनी सैंनिक तिथे पोहोचले आणि वाढदिवस साजरा करण्यापासून रोखलं.

सीएनएन न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनी सैनिकांनी सीमारेषा पार केल्याची माहिती लडाखमधील माजी खासदाराने दिली. खासदाराने स्थानिक महिला सरपंचाने पाठवलेल्या फोटोच्या आधारे ही माहिती दिली. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी खासदार रेगजिन यांनी सांगितलं की, चीन नेहमीच भारतीय सीमारेषा पार करुन घुसखोरी करण्याचं धाडस करत असतं. याची भारतालाही माहिती आहे. पण यासंबंधी कोणीही आवाज उठवत नाही. प्रसारमाध्यमंदेखील काहीच बोलत नाही आणि भारत सरकार शांतता बाळगतं.

माजी खासदारांनी दावा केला आहे की, या परिसरात तीन ते चार वेळा चीनी सैनिकांना पाहिलं गेलं आहे. पण भारताने यावर कोणताही आक्षेप नोंदवलेला नाही. सरकारने यासंबंधी आक्षेप नोंदवत, कठोर पाऊल उचललं पाहिजे अशी मागणी त्यांनी केला आहे.