चीनमधील तिआनजिन शहराजवळ असलेल्या एका कारखान्यामध्ये बुधवारी रात्री झालेल्या शक्तीशाली स्फोटात ४४ जण मृत्युमुखी पडले. शेकडो लोक या स्फोटात जखमी झाले असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की अनेक किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज ऐकू आला आणि स्फोटामुळे निघालेल्या ज्वालांनी रात्रीच्यावेळी काहीवेळ उजाडल्यासारखी स्थिती झाली होती.
चीनमधील अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आग विझवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून १००० अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. या स्फोटामध्ये ५२० लोक जखमी झाले असून, त्यापैकी ६६ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अपायकारक पदार्थांवर प्रक्रिया करण्यात येणाऱया एका कारखान्यामध्ये हा स्फोट झाला. स्फोटामुळे इमारतीचे दरवाजे आणि खिडक्या अनेक किलोमीटर लांब जाऊन पडल्याचे आढळले.
स्फोटापासून काही किलोमीटर दूर राहणाऱया लोकांनाही त्याची तीव्रता जाणवली. तिआनजिनमधील रहिवासी झॅंग सियू म्हणाली, मला वाटले की भूकंप झाला आहे. त्यामुळे पायात बूटही न घालता घरातून धावत धावत बाहेर आले. घरातून बाहेर आल्यावर मला स्फोट झाला असल्याचे समजले. माझ्या घरापासूनदेखील आगीचे लोळ दिसत होते आणि आकाशात धुराचे साम्राज्य पसरले होते.