बीजिंग : पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याबाबत घातलेला ‘तांत्रिक अडथळा’ २३ एप्रिलपर्यंत उठवण्याबाबत अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स यांनी आपल्याला निर्वाणीचा इशारा दिल्याचे वृत्त चीनने बुधवारी नाकारले; मात्र याच वेळी, हा गुंतागुंतीचा मुद्दा ‘सुटण्याच्या मार्गावर’ आहे, असेही सांगितले.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर अझहरला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल-कायदा निर्बंध समितीमार्फत जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा नवा प्रस्ताव अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स यांनी दिला होता. तथापि, हा प्रस्ताव चीनने ‘तांत्रिक आधारावर’ रोखून धरला होता. यानंतर अझहरचे नाव काळ्या यादीत घालण्यासाठी ब्रिटन व फ्रान्सच्या मदतीने अमेरिकेने थेट संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) धाव घेतली होती.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकारक्षेत्रात काम करणाऱ्या १२६७ समितीतच हा मुद्दा सोडवला जावा, असे सांगून सुरक्षा परिषदेचा कायम सदस्य असलेल्या चीनने या कृतीला विरोध केला होता.

१२६७ समितीतील तांत्रिक आक्षेप हटवण्यासाठी वरील तीन देशांनी २३ एप्रिल ही मुदत निश्चित केली असून, असे न झाल्यास हे देश या मुद्दय़ावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतच चर्चेची मागणी करतील या वृत्तावर प्रतिक्रिया विचारली असता, ‘तुम्हाला अशी माहिती कुठून मिळते ते मला माहीत नाही’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कुंग म्हणाले. यूएनएससी आणि तिच्या अंतर्गत काम करणारी १२६७ समिती या दोघांचेही याबाबतीत स्पष्ट नियम व प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.