उत्तराखंडच्या लिपूलेख पासजवळ चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने आता बटालियनची तैनाती केली आहे. लडाख क्षेत्राबाहेर झालेली ही पहिली तैनाती आहे. मागच्या काही आठवड्यांपासून या भागात चिनी सैन्याच्या हालचाली दिसत होत्या. या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी हिंदुस्थान टाइम्सला हे वृत्त दिले आहे.

“लिपूलेख पास, उत्तर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या नियंत्रण रेषेजवळील भागांमध्ये चिनी सैनिकांची संख्या वाढली आहे” असे वरिष्ठ लष्करी कमांडर्सनी सांगितले. लिपूलेख पास मानसरोवर यात्रेच्या मार्गामध्ये आहे. भारताने लिपूलेख पासपर्यंत ८० किमीचा रस्ता बांधला. तेव्हापासून हा मार्ग चर्चेत आहे. कारण नेपाळने यावर आक्षेप घेतला. नेपाळने आपल्या नकाशात बदल केला आहे. कालापानी, लिपूलेख, लिंपियाधुरा हे भारतीय भूभाग नकाशात आपल्या हद्दीत दाखवले आहेत. नेपाळमधील ओली सरकारच्या या निर्णयामुळे भारत-नेपाळ संबंध खराब झाले आहेत.

आणखी वाचा- लडाखवरुन नजर हटवणार नाही, जवानांसाठी सियाचीन सारखी साधन सामग्री खरेदी करणार

भारत-चीन नियंत्रण रेषेच्या जवळ राहणारे दोन्ही बाजूचे नागरिक जून-ऑक्टोंबर या काळात लिपूलेख मार्गाच्या माध्यमातून वस्तु व्यापार करतात. लिपूलेख पासजवळ चीनने तैनात केलेल्या बटालियनमध्ये जवळपास १ हजार सैनिक आहेत. सीमेपासून काही अंतरावर हे सैनिक तैनात आहेत. ‘चिनी सैनिक तयार आहेत, हा या मागचा संदेश आहे’ असे दुसऱ्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. नेपाळने भारतीय भूभागावर दावा केला आहे, त्यामुळे नेपाळच्या घडामोडींवर सुद्धा भारताचे अत्यंत बारीक लक्ष आहे.

आणखी वाचा- ‘लडाखमध्ये भारताने जे करुन दाखवलं ते…’ अमेरिका म्हणते…

मे महिन्यापासूनच पूर्व लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने उभे ठाकले होते. १५ जूनच्या संध्याकाळी गलवान खोऱ्यात या तणावाने टोक गाठले. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये ४५ वर्षात पहिल्यांदाच रक्तरंजित संघर्ष झाला. तीन आठवड्यानंतर दोन्ही देशांनी सैन्य आमने-सामने असलेल्या भागांमधून मागे हटण्याचा निर्णय घेतला. ही प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. पँगाँग टीएसओमध्ये तणावाची स्थिती कायम आहे.