चीनमधील नेपाळचे राजदूत महेंद्र बहादुर पांडे यांनी चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीवरून वाद निर्माण झाला आहे. चीन आणि नेपाळ यांच्यातील संबंधांबद्दल बोलताना नेपाळच्या राजदूतांनी भारत आणि भारतीय माध्यमांवर निशाणा साधला. तसंच तसंच चीनसोबत नेपाळचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचाही पुनरूच्चार केला. भारतीय माध्यमांकडून नेपाळ-चीन संबंध बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही नेपाळच्या राजदूतांनी मुलाखतीदरम्यान केला. परंतु पांडे यांच्या या मुलाखतीनंतर त्यांना आपल्या देशातच अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे.

नेपाळमधील अनेक जाणकारांनी पांडे यांनी भारतावर केलेल्या आरोपांवरून त्यांच्यावर टीका केली आहे. पांडे यांनी अशावेळी भारतावर आरोप केले जेव्हा खुद्द चीननंच नेपाळमध्ये येणारे अत्यावश्यक वस्तूंचे ट्रक बऱ्याच काळापासन आपल्या सीमेवर थांबवले आहेत. तसंच पांडे यांनी केलेली विधानं हास्यास्पद असल्याचंदेखील जाणकारांचं म्हणणं आहे. तत्पूर्वी, नेपाळचे राजदूत महेंद्र बहादुर पांडे यांनी भारतीय माध्यमं चीन आणि नेपाळबद्दल बनावट बातम्या देत असल्याचा आरोप केला. तसंच चीनने नव्हे, तर नेपाळच्या भूमीवर भारतानं कब्जा केला आहे, असा दावाही त्यांनी केला. नेपाळी राजदूताचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा नेपाळमधील माध्यमांनी स्वत: चीननं नेपाळच्या जमीनीवर कब्जा केल्याचा दावा केला होता.

नेपाळमधूनच टीका

“भारतीय माध्यम असं भीतीपोटी असे करत आहेत. नेपाळ हा एक स्वतंत्र देश आहे. आमचा कोणत्याही गटाकडे कल नाही. भारतीय माध्यमांची भूमिका ही पक्षपाती असू शकते किंवा त्यांची कोणीतरी दिशाभूलही केलेली असू शकते. या कारणास्तव ते खोट्या बातम्या देतात किंवा प्रचार करतात. पण ते वास्तव नाही. चीन आणि नेपाळमधील सहकार्य नैसर्गिक आणि मैत्रीपूर्ण आहे,” असं पांडे यांनी मुलाखतीदरम्यान नमूद केलं.

पांडे यांच्या या मुलाखतीनंत त्यांच्यावर अनेक आपल्याच देशातून टीका होऊ लागली. पांडे यांची वक्तव्य अयोग्य असल्याचं नेपाळमधील वृत्तपत्र काठमांडू पोस्टनं म्हटलं. तसंच नेपाळमधील परराष्ट्र विषयांचे जाणकार दिनेश भट्टराई यांनी काठमांडू पोस्टशी यासंदर्भात संवाद साधला. “भारत. चीन किंवा कोणत्याही अन्य देशांमध्ये आपले राजकारणी त्यांच्याच बाजूनं का बालू लागतात हे समजत नाही. पांडे यांनी ज्याप्रकारे वक्तव्य केलं त्यावरून आपल्याच अडचणींमध्ये वाढ होणार आहे. नेपाळच्या राजदूतांनी नेपाळच्या जमिनीवरील अतिक्रमण आणि अन्य समस्यांबाबतही चुकीचं वक्तव्य केलं,” असं त्यांनी नमूद केलं.

“भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांतील संबंधांना आपल्याला वाजूला सारून चालणार नाही. दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक, सामाजिक संबंध आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही देशांतील नागरिकांना दोन्ही देशांमध्ये ये-जा करण्याचंही स्वातंत्र्य आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील संबंध निरनिराळे आहेत हे आपल्याला समजण्याची गरज आहे. कोणी कोणाची जागा घेऊ शकत नाही आणि हे एक भौगोलिक वास्तवदेखील आहे,” असं भट्टराई म्हणाले.