गेल्या काही महिन्यांपासून भारत चीन सीमेवर तणावाचं वातावरण आहे. एकीकडे भारताकडून चर्चेचा मार्ग अवलंबला जात असला तरी चीनकडून कुरापती मात्र सुरूच आहेत. सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं आता नवी खेळी खेळली आहे. चीननं फिंगर ४ या ठिकाणी लाऊडस्पीकर लावले आहेत. तसंच चीनकडून या लाऊडस्पीकरवर पंजाबी गाणी वाजवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, चीन लाऊडस्पीकरद्वारे आता भारतीय जवानांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार फिंगर ४ परिसरात चीनच्या लष्कारानं लाऊडस्पीकर लावले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी चिनी सैनिकांनी लाऊडस्पीकरल लावले आहेत तो परिसर भारतीय जवानांच्या देखरेखीखाली आहे. दरम्यान, चीन भारतीय जवानांचं लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच जवानांवर मानसिकरित्या दबाव आणण्यासाठी चीनकडून या कुरापती सुरू असल्याचंही सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी दोन्ही देशांमध्ये या ठिकाणी गोळीबारही झाला होता. दोन्ही बाजूंच्या जवानांनी १०० ते २०० राऊंड फायरिंग केली होती. मागील २० दिवसांमध्ये भारत आणि चीनदरम्यान पूर्व लडाखमध्ये तीन वेळा गोळीबारीच्या घटना घडल्या आहेत. पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर्सवर वर्चस्व मिळवण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आला असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं यापूर्वी सांगितलं होतं. फिंगर तीन आणि फिंगर चारची रिजलाइन जिथे मिळते, त्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी १०० ते २०० गोळ्यांच्या फैरी हवेत झाडण्यात आल्या, अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली होती.

टेकड्या ताब्यात

यापूर्वी २९-३० ऑगस्टच्या रात्री भारतीय सैन्याच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सने पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळच्या महत्त्वाच्या टेकड्या ताब्यात घेतल्या. तेव्हापासून, भारतीय सैन्याला तिथून हटवण्यासाठी चीनचे बरेच प्रयत्न सुरु आहे. पण चीनचे सर्व डाव भारतीय लष्कराने हाणून पाडले आहेत. दक्षिण किनाऱ्यावरील उंचावरील भागात मोक्याच्या ठिकाणी भारतीय सैन्य तैनात आहे. त्यामुळे LAC वरील चिनी सैन्य दलाच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवता येत आहे.