चीनमध्ये २२ बळी, एकूण संख्या ३१५८

बीजिंग : चीनमध्ये करोना विषाणूचा संसर्ग ओसरू लागला असून मंगळवारी तेथे २२ जण मरण पावले तर एकूण मृतांचा आकडा ३१५८ झाला आहे. दरम्यान बीजिंग प्रशासनाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्याचा आदेश जारी केला असून कुठल्याही देशातून आलेल्या विमानातील लोकांना बीजिंगमध्ये ते ज्या हॉटेल्समध्ये राहतील तेथे वेगळे ठेवण्यात येणार आहे.

चीनच्या आरोग्य आयोगाने दिलेल्या  माहितीनुसार मंगळवारी २२ बळी गेले असून २४ जणांना नव्याने संसर्ग झाला आहे. सर्व २२ बळी हुबेई प्रांत व वुहानमधील असून आता चीनमध्ये एकूण निश्चित रुग्णांची संख्या ८०७७८ असून त्यात ३१५८ मृतांचा समावेश करण्यात आला आहे. १६१४५ जणांवर उपचार करण्यात येत असून ६१७४५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान ३१ नवीन संशयित रुग्ण देशात सापडले असून एकूण संख्या २८५ झाली आहे. परदेशातून आलेल्या लोकांमुळे करोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

मंगळवारी एकूण १० परदेशी लोकांना करोनाचा संसर्ग असल्याचे दिसून आले. त्यात सहा बीजिंग, दोन शांघाय, १ शाँडाँग व १ गान्शू अशी आकडेवारी आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी वुहान येथील रुग्णालयांना मंगळवारी भेट दिली त्यावेळी लष्करी अधिकारी, पोलीस अधिकारी, स्वयंसेवक, डॉक्टर्स यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्यासमवेत लष्करी व आरोग्य अधिकाऱ्यांचा ताफा होता.

सुरुवातीला परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली त्याबाबत जिनपिंग यांच्यावर टीका झाली होती पण नंतर त्यांनी परिस्थिती चांगली हाताळली असे सांगण्यात आले. हुबेई व वुहानमध्ये ३००० वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला होता त्यातील १० जण मरण पावले आहेत. वुहानमधील १४ तात्पुरती रुग्णालये बंद करण्याचा निर्णय चिनी अधिकाऱ्यांनी यावेळी जाहीर केला.