चीनचा जम्मू-काश्मीरमधील हस्तक्षेप वाढत असून त्यांनी जैश- ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला दत्तक घेतले आहे, असा दावा जम्मू- काश्मीरमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री नईम अख्तर यांनी केला. यामुळेच चीन संयुक्त राष्ट्रात मसूद अझहरविरोधातील भारताच्या प्रस्तावात आडकाठी आणत असल्याचे अख्तर यांनी म्हटले आहे.

जम्मू- काश्मीरमधील मंत्री नईम अख्तर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना राज्यात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपावर भाष्य केले. ते म्हणाले, काश्मीरमध्ये आता नवी खेळी सुरु आहे. काश्मीर हा आता फक्त भारत- पाकिस्तानमधील प्रश्न राहिला नाही. तर आता यात चीनचाही समावेश झाला आहे. लष्कर प्रमुख रावत म्हणतात, की सैन्य दोन्ही सीमेवर सज्ज आहेत. पण आता हे दोन्ही देश काश्मीरमध्ये एकत्र आले आहेत. गेल्या तीन वर्षांत जम्मू- काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये जैश- ए- मोहम्मदचा हात असल्याचे समोर आले. या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावात चीन आडकाठी आणत आहे. मसूद अझहरला चीनने दत्तक घेतले हे कोणाला कळत कसं नाही?. पाकमध्ये हाफीज सईदवरही कारवाई होते. मात्र, मसूद अझहरवर अजून एकदाही कारवाई झालेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सलाहउद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले जाते. पण अझहरबाबत अजूनही कारवाई होत नाही. ठोस कारण असल्याशिवाय चीनकडून असं होणार नाही. या प्रकरणातील चीनचे कनेक्शन लक्षात घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.  चीनच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे भारत – पाकमध्ये तातडीने चर्चा होणे गरजेचे आहे. तुम्हाला जर चीनची खेळी समजली नाही तर तुम्हाला या चर्चेचे महत्त्व कळणार नाही, असेही त्यांनी सांगितले. राज्यात जैशचे दहशतवादी सुरक्षा दलांना लक्ष्य करु शकतात. तर सर्वसामान्यांची अवस्था काय असेल, त्यामुळे राज्यातील पीडीपी- भाजप सरकारसमोर आव्हाने आणखी कठीण आहेत, असेही ते म्हणालेत.

पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनकडून खोडा घातला जात आहे. संयुक्त राष्ट्रात चीनने ‘नकाराधिकाराचा’ वापर करत भारताच्या प्रयत्नांना खीळ घातली आहे. या पार्श्वभूमीवर नईम खान यांनी हा दावा केला आहे.