भारताने आम्हाला कमी लेखू नये. चीन आपल्या प्रादेशिक सार्वभौमत्त्वाचं रक्षण करु शकतो असं चीनने म्हटलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी हे ट्विट केलं आहे. लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. याच पार्श्वभूमीवर हुआ चुनयिंग यांनी हे ट्विट केलं आहे.

“सध्याच्या परिस्थितीचा भारताने चुकीचा अर्थ लावू नये किंवा चीनच्या आपल्या प्रादेशिक सार्वभौमत्त्वाचं रक्षण करण्याचा भूमिकेला कमी लेखू नये,” असं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी अजून एक ट्विट केलं असून पुन्हा एकदा भारतीय जवानांनी वास्तविक नियंत्रण रेषा ओलांडून चिनी सैनिकांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

“भारतीय जवानांनी चर्चेत झालेल्या सहमतीचं उल्लंघन करत वास्तविक नियंत्रण रेषा ओलांडली आणि जाणुनबुजून चिनी अधिकारी आणि जवानांवर हल्ला करत चिथावण्याचा प्रयत्न केला. यामुळे जवानांमध्ये झटापट झाली आणि दोन्ही देशांचं नुकसान झालं,” असं त्यांनी म्हटलं आहे.

चीनकडून याआधीही भारतीय जवानांनीच नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारताने मात्र चीनचे आरोप फेटाळून लावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “१५ जूनच्या रात्री चीनकडून एकतर्फीपणे वास्तविक नियंत्रण रेषेवरील सद्यस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन्ही सैन्यांचं नुकसान झालं आहे जे टाळता आलं असतं. चीनकडून ६ जून रोजी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर तसंच वाद कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यासंबंधी झालेल्या सहमतीचं उल्लंघन करण्यात आलं”.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असं सागंत चीनला ठणकावलं आहे. लडाखमध्ये झालेल्या या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले असून चीनचे जवळपास ४० जवान ठार तसंच गंभीर जखमी झाले आहेत. सध्या दोन्ही देशांमध्ये तणाव असून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे.