करोनाविरुद्धच्या उपाययोजना आणि त्यासंदर्भातील निर्णयांवरुन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर सार्वजनिकरित्या टीका करणाऱ्या चीनमधील एका बड्या उद्योजकाला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी रियल इस्टेट कंपनीचे माजी अध्यक्ष रेन झिकियांग यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवत त्यांना १८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही कारवाई करण्याआधी चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने झिकियांग यांची पक्षामधून हकालपट्टी केली होती. विशेष म्हणजे करोना परिस्थित संभाळण्यात शी जिनपिंग यांना अपयश आल्याची टीका केल्यानंतर झिकियांग हे सार्वजनिक ठिकाणी फारसे दिसले नाहीत आणि आता थेट त्यांना दिलेल्या शिक्षेची बातमी समोर आली आहे.

चीनची राजधानी असणाऱ्या पेइचिंगमधील न्यायालयाने झिकियांग यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये दोषी ठरवलं आहे. करोडो डॉलर्सची लाच घेतल्याचा आरोपही झिकियांग यांच्यावर ठेवण्यात आला आहे. न्यायाधिशांनी झिकियांग यांना १८ वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्याबरोबरच सहा लाख २० हजार डॉलरचा दंडही ठोठावला आहे. झिकियांग यांनी स्वत: आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे. झिकियांग यांच्याकडे बेकायदेशीर संपत्ती आढळून आल्याचे लक्षात आल्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात येत आहे असंही न्यायालयाने म्हटलं आहे. “भ्रष्टाचार, लाचखोरी आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर या प्रकरणांमध्ये झिकियांग यांना दोषी ठरवण्यात आलं आहे”, असं ‘ग्लोबल टाईम्स’च्या या सरकारी वृत्तपत्राने म्हटलं आहे.

लिहिला होता लेख

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये राष्ट्रीय नेतृत्वासंदर्भात प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप ठेऊन त्यांना तुरुंगात डांबलं जातं. प्रसारमाध्यमांवर सरकारचे असलेले नियंत्रण आणि इतर संवेदनशील विषयांवर आपले मत मांडण्यासाठी ओळखले जाणारे झिकियांग यांनी मार्च महिन्यामध्ये एका वेबसाईटवर आपला लेख प्रकाशित केला होता. त्यानंतर ते सार्वजनिक जिवनामध्ये फारसे दिसून आलेले नाहीत.

काय होतं लेखात?

झिकियांग यांनी लिहिलेल्या या लेखामध्ये शी जिनपिंग यांच्यावर टीका केली होती. डिसेंबर महिन्यामध्ये वुहानमधून उद्रेक झालेल्या करोना संसर्गाच्या संकटाचा समाना करण्यात शी जिनपिंग यांना अपयश आल्याचे झिकियांग यांनी म्हटलं होतं. बीजिंगमधील शीचेंग जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भातील आयोगाने आपल्या वेबसाईटवर ६९ वर्षीय झिकियांग यांच्यावर भ्रष्टाचार, लाच स्वीकारणे आणि सरकारी मालकीच्या कंपनीमध्ये पदाचा स्वत:च्या फायद्यासाठी गैरवापर करणे असे आरोप सिद्ध झाल्याचे म्हटले आहे.

चीनमध्ये अनेकांना झालीय शिक्षा

हॉयुआन या कंपनी समुहाचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे उप सचिव म्हणून काम केलेल्या झिकियांग यांची कम्युनिस्ट पार्टीने पक्षातून हकालपट्टी केली आहे. मात्र यामागे नक्की काय कारण आहे हे पक्षाने स्पष्ट केलेलं नाही. चीनमध्ये २०१२ साली सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून निवडूण आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष झालेल्या शी जिनपिंग यांच्याविरोधात होणारी टीका, राजकीय गोष्टींवर भाष्य करण्यासंदर्भातील सेन्सॉरशीप अधिक कठोर करण्यात आली आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्या बिगर सरकारी संस्थांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. अनेक पत्रकार, कामगार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना आणि टीकाकरांना अटक करुन तुरुंगात डांबण्यात आलं आहे.