भारत, चीन आणि भूतान सीमेवरील डोक्लाम प्रांतात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर चिनी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने भारताच्या विकासावर भाष्य केले आहे. ‘भारताच्या प्रगतीवर चीनने शांत रहावे,’ असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. भारतातील परकीय गुंतवणुकीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे चीनने भारताशी दोन हात न करता देशाच्या विकासाची योजना आखावी, असे ग्लोबल टाईम्सने लेखात म्हटले आहे.

‘परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढत असल्याने भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे. त्यामुळे भारत आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यशाली होत आहे. भारतात औद्योगिक विकास वेगाने होत असल्याने रोजगारांमध्ये वाढ झाली आहे. भारताच्या विकासाचा वेग पाहता, चीनने शांत राहून भारताचा सामना करण्यासाठी रणनिती आखायला हवी,’ असे या वृत्तपत्राने म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ग्लोबल टाईम्सने ‘भारताचे चीनप्रमाणे औद्योगिक विकासाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू,’ या शीर्षकाखाली लेख लिहिला आहे.

‘परदेशातील अनेक कंपन्या भारतात मोठी गुंतवणूक करत आहेत. यामध्ये चीनमधील काही कंपन्यांचादेखील समावेश आहे. यामुळे भारताची निर्मिती क्षमता वाढेल आणि त्याचा मोठा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होईल. अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याने रोजगार वाढेल. यामुळे औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होईल,’ असे वृत्तपत्राने लेखात म्हटले आहे. चीननेदेखील परकीय गुंतवणूक आकर्षून घेत औद्योगिक विकास साधला होता, असेही या वृत्तपत्राने नमूद केले आहे.

भारत आणि चीनमधील संबंध सध्या प्रचंड ताणलेले आहे. भारत, चीन आणि भूतानच्या सीमेवरील डोक्लाममध्ये चीनकडून रस्त्याची निर्मिती केली जाते आहे. भारतीय सैन्याने चिनी सैन्याच्या रस्ते निर्मितीच्या कामाला विरोध केला आहे. त्यामुळे सिक्किम सीमेवर दोन्ही देशांचे जवान आमनेसामने उभे ठाकले आहेत. भारताने सैन्य मागे घ्यावे, अन्यथा परिणाम वाईट होतील, असे इशारे वारंवार चीनकडून देण्यात आले आहेत. मात्र चीनच्या धमक्यांना किंमत न देता भारतीय सैन्य सिक्किममध्ये पाय रोवून उभे आहे.