अमेरिका आणि चीनमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेने चिनी अधिकाऱ्यांवर निर्बंध घालण्याची भूमिका जाहीर केली. त्यानंतर चीननेही लगेच अमेरिकन नागरिकांच्या व्हिसावर निर्बंध घालणार असल्याचे जाहीर करुन प्रत्युत्तर दिले. तिबेट प्रांतामध्ये चीन मानवी हक्कांचे उल्लंघन करत असल्याबद्दल अमेरिकेने चिनी अधिकाऱ्यांना व्हिसा नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.

“तिबेटमध्ये चीन कुठल्याही परकीय शक्तीला हस्तक्षेप करु देणार नाही. तिबेट संबंधीच्या आमच्या अंतर्गत विषयांमध्ये अमेरिकेने तात्काळ हस्तक्षेप थांबावावा. अमेरिकेने चुकीच्या मार्गाने जाऊ नये” असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी म्हटले आहे. तिबेटची सीमा भारताला लागून आहे. या प्रांतामध्ये चीनने बरेच निर्बंध घालून ठेवले आहेत.

परदेशी नागरिकांच्या तिबेटमध्ये प्रवेश करण्यावर चीनने निर्बंध घालून ठेवले आहेत. फक्त अमेरिकाच नाही राजनैतिक अधिकारी, पत्रकार यांना सहजतेने तिबेटला जाता येत नाही. फक्त चीनने निमंत्रित केलेल्या पाहुण्यांना तिबेटला जाता येते पण त्यावेळी नेहमीच त्यांच्यासोबत कोणीतरी असतो.

तिबेटमधील मानवी हक्काच्या मुद्दावरुन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी चिनी अधिकाऱ्यांचा व्हिसा रोखणार असल्याचे म्हटले होते. कारण अमेरिकेचे अधिकारी, पत्रकार, पर्यटक यांना तिबेटमध्ये जाण्यास चीनकडून मज्जाव करण्यात येतो. अमेरिकेने चिनी अधिकाऱ्यांवर निर्बंध घालण्याची भूमिका जाहीर केली.  त्यानंतर चीननेही आता अमेरिकन नागरिकांचा व्हिसा रोखण्यााचा निर्णय जाहीर केला आहे.