भारतातून येणाऱ्या सोयाबीनवरचा आयात कर कमी करण्याचा निर्णय

भारत व आशिया पॅसिफिक देशातून येणाऱ्या सोयाबीनवरचा आयात कर कमी करण्याचे चीनने  ठरवले असून त्याची अंमलबजावणी १ जुलैपासून होत आहे. अमेरिकेने चीनच्या वस्तूंवर आयात कर वाढवल्यानंतर चीनने अमेरिकी सोयाबीनवर आयात शुल्क वाढवले आहे. चीनच्या मंत्रिमंडळाने भारत व आशिया पॅसिफिक देशातून येणाऱ्या सोयाबीनवरचा कर कमी करण्याचा निर्णय घेतला.

भारत, दक्षिण कोरिया, बांगलादेश, लाओस, श्रीलंका या देशांतून येणाऱ्या सोयाबीनवर आधी तीन टक्के आयात कर होता तो आता शून्य टक्के केला जाईल असे चीनच्या मंत्रिमंडळाने म्हटले आहे. या देशातून येणारी काही रसायने, कृषी उत्पादने, वैद्यकीय उपकरणे, कपडे, पोलाद, अ‍ॅल्युमिनियम उत्पादनांवरचा आयात कर कमी करण्याचे चीनने ठरवले आहे. या सर्व देशातून येणाऱ्या मालावर आशिया-पॅसिफिक व्यापार कराराच्या दुसऱ्या दुरुस्तीनुसार आयात कर लागू होईल. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी चीनला द्विपक्षीय व्यापार तूट ३७५ अब्ज डॉलर्सनी कमी करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. या सगळ्या स्थितीचा फायदा घेऊन भारताने चीनला बाजारपेठ खुली करून औषधे, माहिती तंत्रज्ञान उत्पादने या क्षेत्रात वाव देण्याची विनंती केली होती.

भारत-चीन यांच्यात एप्रिलमध्ये झालेल्या संवादाच्यावेळी नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी भारतातून चीनला साखर व सोयाबीन निर्यात करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

वुहान येथे मोदी व क्षी जिनपिंग यांच्यात शिखर बैठकीनंतर दोन्ही देशांनी निर्यात वाढवण्याचे ठरवले होते. तांदूळ, साखर, औषधे, कर्करोगाची औषधे यांची निर्यात भारतातून चीनला करण्याचा मुद्दा त्यावेळी मोदी यांनी उपस्थित केला होता.