पूर्व लडाखमध्ये सीमावाद सुरु झाल्यापासून चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी पँगाँग टीएसओच्या परिसरावर हायस्पीड गस्ती नौकांद्वारे लक्ष ठेवून आहे. चीनकडून टाइप ३०५ आणि टाइप ९२८ डी बोटींचा वापर करण्यात येतो. या नौका स्वीडीश सीबी-९० ची कॉपी आहे.

चीन पँगाँग टीएसओ परिसरातील फक्त भूभागावरच नव्हे, तर पाण्याखालून कुठली हालचाल होऊ नये, यावरही चीन लक्ष ठेवून आहे. भारत पाण्याखालून हल्ला करु शकतो, ही भीती चीनच्या मनात आहे. जगभरातील नौदलं ज्या पाणबुडी विरोधी तंत्रज्ञानाचा वापर करतात, त्याचाच वापर चीनकडून सरु आहे. ताज्या उपग्रह छायाचित्रांवरुन हा खुलासा झाला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

फिंगर चार ते फिंगर आठ दरम्यान चीनने एकूण १३ बोटी तैनात केल्या आहेत. पँगाँग टीएसओ तलावात पाण्याखाली चालणाऱ्या हालचालींवर पीएलए एअर फोर्सने बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. यासाठी पीएलओ एअर फोर्सने मॅग्नेटिक अ‍ॅनोमली डिटेक्टर बूम बसवलेल्या विशेष विमानांचा वापर सुरु केला आहे. विमानाच्या शेपटाकडे हे उपकरण असते.

पीएलएच्या नौदलाकडून पाणबुडीविरोधात Y-8 GX6 किंवा Y-8 या विमानांचा वापर केला जातो. या विमानांवर बसवण्यात आलेल्या उपकरणांवरुन समुद्राच्या आत असलेल्या पाणबुडयांचा शोध घेता येतो तसेच खनिज आणि जमिनीच्या पृष्ठभागावरील मातीची सुद्धा ओळख पटवता येते. होतान, कोरला आणि वुडून येथील उपग्रह छायाचित्रांमध्ये ही विमाने दिसली आहेत. त्यावरुन चीन पँगाँग टीएसओ तलावात पाण्याखालील हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट झाले आहे.