भारत अमेरिका यांच्यात २००७-०८ मध्ये करण्यात आलेला अणु करार रोखण्यासाठी चीननं भारतातील डाव्यांना हाताशी धरलं होतं. भारतातील डाव्या नेत्यांच्या माध्यमातून चीननं देशात विरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असा धक्कादायक दावा भारताचे माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी केला आहे. भारतातील राजकारणात चीन सक्रिय झाल्याचं बहुतेक हे पहिलं उदाहरण असावं, असंही गोखले यांनी म्हटलं आहे.

सेवानिवृत्त परराष्ट्र सचिव विजय गोखले यांचं ‘द लाँग गेम : हाऊ द चायनिज निगोशिएट विथ इंडिया’ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात २००७-०९ या काळात गोखले अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. याकाळात गोखले चीनसोबत बोलणी करत होते. याच काळात करारावर चर्चा सुरू होती आणि बीजिंगने नमती भूमिका घेतल्यानंतर भारताला अणु पुरवठादार समूहाकडून मोठी सूट देण्यात आली होती.

या पुस्तकाक विजय गोखले यांनी भारत-अमेरिका अणु करारात चीनकडून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट केला आहे. “चीननं भारतातील डाव्या पक्षांशी असलेल्या जवळच्या संबंधाचा वापर केला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माक्सर्वादी) या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेते बैठक वा उपचारासाठी चीनला जातील. सीमावाद आणि द्विपक्षीय संबंधासह अन्य मुद्द्यांवर दोन्ही पक्षांची भूमिका राष्ट्रवादी होती. पण, चीनला भारत-अमेरिका यांच्यात होणाऱ्या अणु कराराची चिंता सतावत होती”, असं गोखले यांनी पुस्तकात लिहिलं आहे.

“डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये डाव्यांच्या किती प्रभाव आहे, याविषयी चीनला कल्पना होती आणि भारतीय अमेरिकेकडे झुकतील या भीतीवर चीनने खेळी केली. भारतीय राजकारणात चीनने हस्तक्षेप केल्याचं हे पहिलं उदाहरण असू शकतं. हे करताना चीननं स्वतःला पडद्यामागे राहू अशी खबरदारी घेतली. चीननं डावे पक्ष आणि डाव्या विचारांच्या माध्यमांतून अणु कराराविरुद्ध काम करण्याचा प्रयत्न केला”, असं गोखले यांनी लिहिलं आहे.