तुम्ही कधी आकाशात पक्ष्यांना उडताना पाहत असाल तेव्हा सतर्क राहा. कारण हे पक्षी नसून चीनने तयार केलेले पक्ष्यांच्या आकाराचे ड्रोन असू शकतात. हे ड्रोन तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणारे असू शकतात. चीनने नुकतेच पक्ष्यांसारखे दिसणारे ड्रोन तयार केले असून ते सीमाभागात घिरट्या घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताच्या सुरक्षेच्यादृष्टीने ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे. दक्षिण चीनमधील मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, शिनजियांग या प्रांतात या तंत्राचा अतिशय चांगल वापर केला जातो. चीनची ही सीमा भारताच्या सीमेनजीक आहे.

भारताशिवाय शिनजियांग प्रांताच्या सीमेवर मंगोलिया, रशिया, कजाकीस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे देश येतात. चीनचा हा प्रांत मुस्लिमबहुल असून पेईचिंग शिनजियांग या प्रांताला आतंकी म्हणतो. त्यामुळेच चीनचे सरकार या प्रांतावर विशेष नजर ठेवते. चीनने तयार केलेले हे पक्ष्यांच्या आकाराचे ड्रोन पक्ष्यांप्रमाणेच हवेत उडू शकतात, पंखांची फडफडही करु शकतात. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, हे ड्रोन रडारच्या कक्षेतही येत नाहीत. आता हे ड्रोन पक्ष्यांची नक्कल करण्यात ९० टक्के सफल झाले आहेत.

या ड्रोनमधून अतिशय कमी आवाज येतो ज्यामुळे त्याची सत्यता तपासणे अवघड आहे. या ड्रोनचे २ हजार वेळा परिक्षण करण्यात आले आहे. हे ड्रोन एकावेळी जवळपास ३० मिनिटे फिरु शकतात. त्यांचे वजन २०० ग्रॅम असून ४० किलोमीटर प्रतीतास या वेगाने चालते. यात एचडी कॅमेरा, जीपीएस अँटीना, फ्लाईट कंट्रोल अशा सगळ्या गोष्टी बसविण्यात आल्या आहेत.