लडाखच्या पूर्वेतील गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान झालेल्या हिंसक झटापटीनंतर आता भारत आणि चीन सीमेवरही चीनचा डोळा असल्याचे वृत्त समोर आलं आहे. राजस्थानला लागून असणाऱ्या भारत पाकिस्तान सीमा भागामध्ये चीनने आर्थिक गुंतवणूकीच्या नावाखाली युद्धाभ्यासाची तयारी सुरु केली आहे. दैनिक भास्करने यासंदर्भात एक वृत्त दिलं असून यामध्ये चिनी हवाईदल आता भारत पाकिस्तान सीमेजवळील एअरबेसवर खूपच सक्रीय झाल्याचे म्हटले आहे. एका अहवालाचा संदर्भ देत या भागामध्ये मागील काही दिवसांपासून चीन सक्रीय झाला आहे. तर ‘इकनॉमिक टाइम्स’नेही यासंदर्भात वृत्तांकन केलं असून राजस्थान सीमेजवळ असणाऱ्या स्कार्डू एअरबेसवर मागील आठवड्यामध्ये इंधन भरणारे एक विमान उतरल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच आता भारताने पावले उचलण्यास सुरुवात करत या एअरबेसवरील हलचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

स्कार्डू एअरबेसवर मागील काही दिवसांमध्ये हलचाल दिसून आल्याचे वृत्तामध्ये म्हटलं आहे. चिनी लष्कराचे आयएल ७८ रणगाडे या एअरबेसजवळ दिसल्याचेही नमूद करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांमध्ये या एअरबेसवर पाकिस्तान हवाईदलाची मालवाहू विमानही दिसून आली आहे.

आर्थिक गुंतवणूक करत इकनॉमिक कॉरिडोअर बनवण्याच्या नावाखाली या भागामध्ये गुप्तचर विभागाशी संबंधित माहितीची देवाणघेवाण होत असल्याची शंका बऱ्याच काळापासून व्यक्त केली जात आहे. चीन पाकिस्तान इकनॉमिक कॉरीडोअरच्या नावाखाली राजस्थानमधील भारत पाक सीमेजवळच्या चार जिल्ह्यांमध्ये चिनी कंपन्यांची मोठ्या प्रमाणामध्ये लूडबूड सुरु असल्याचे दिसून येत आहे. जैसलमेर, बाडमेर, बीकानेर आणि गंगानगर सारख्या जिल्ह्यांच्या सीमांजवळ ३० हजारच्या आसपास चीनी इंजिनियर्स आणि तज्ज्ञ सक्रीय असल्याचे सांगण्यात येत आहे. बाडमेरमधील जवाहर शाह, शामगढ या सीमांना लागून असणाऱ्या भागांमध्येही चिनी कंपन्यांची काम सुरु आहेत. निवृत्त मेजर जनरल शेरसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक गुंतवणूकीच्या नावाखाली मागील दोन दशकांपासून चीनने या भागांमध्ये पाय रोवले आहेत. चीनने या भागामध्ये पाकिस्तानी लष्कराला मदत करुन बऱ्याच प्रमाणात बांधकाम केलं आहे. या दोन्ही देशामध्ये गुप्त माहितीची देवणघेवाण केली जात असल्याचेही सांगितले जाते.

५०० बंकर उभारले

पाकिस्तानी सीमेजवळ चीनने आतापर्यंत चौक्या, बुरुज आणि ५०० हून अधिक बंकर बांधले आहेत. या चौक्यांवर चीनने सोलार पॅनल, सीसीटीव्ही, ड्रोनचीही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. चीनने यापूर्वी कराची, क्वेटा, जकोकाबाद, रावळपिंडी, सरगोडा, पेशावर, मेननवाली आणि रिशालपूर येथील पाकिस्तानी एअरबेसवरील सुविधा अद्यावत करण्यासाठी पाकिस्तानची मदत केली आहे.